Jharkhand Assembly Elections 2024 : झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा (Jharkhand Elections 2024) दिसून येत आहे. राज्यातील जवळपास अर्धा डझन मतदारसंघांत राजकीय वारसा जपण्यासाठी सूना निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन (Shibu Soren) यांच्या सूना कल्पना आणि सीता, माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून पौर्णिमा साहू प्रमुख आहेत. यातील काही नेत्यांच्या सूना आधीच राजकारणात सेटल झाल्या आहेत. तर काही जणी पहिल्यांदाच राजकारणात नशीब आजमावत आहेत. आज याच राजकीय सून बाईंची माहिती घेऊ या..
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या दोन सूना निवडणूक लढवत आहेत. गिरीडोहमधील गांडेय विधानसभा मतदारसंघात कल्पना सोरेन (Kalpana Soren) रिंगणात आहेत. २०२४ मध्ये या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना सोरेन विजयी झाल्या आहेत. हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) तुरुंगवास झाल्यानंतर कल्पना यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्या कल्पना यांचा विवाह ७ फेब्रुवारी २००६ रोजी हेमंत सोरेन यांच्याशी झाला होता. राजकारणात येण्याआधी कल्पना सोरेन शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या.
शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन या देखील राजकारणात आहेत. सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन यांच्या निधनानंतर राजकारणात आल्या. त्या जामा मतदारसंघातून आमदारही राहिल्या आहेत. नंतर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) आधी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांना जामताडा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ भाजपसाठी सोपा नाही. या मतदारसंघात भाजप विरोधी मतांचा मोठा प्रभाव आहे.
दलबदलू अन् वारसदारांची चांदी.. झारखंड भाजपाच्या पहिल्या यादीत आयारामांना लॉटरी!
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि अध्या ओडिशा राज्याचे राज्यपाल रघुबर दास यांची सून पौर्णिमा साहू जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१९ मधील निवडणुकीत स्वतः रघुबर दास या ठिकाणी पराभूत झाले होते. या पराभवाबरोबरच राज्याच्या राजकारणातून त्यांची एक्झिट झाली होती. सन २०१९ मध्ये पौर्णिमा साहू यांचा विवाह ललित दास यांच्याशी झाला. राजभवनातील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावर मारहाणीचा आरोप केल्यानंतर ललित दास अचानक चर्चेत आले होते. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता.
छत्तीसगड येथील मूळ रहिवासी पौर्णिमा यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. आता रघुबर दास यांचा राजकीय वारसा परत मिळवण्याचं आव्हान पौर्णिमा साहू यांच्यासमोर आहे. या निवडणुकीत पौर्णिमा साहू काय कामगिरी करतात. सासऱ्यांचा राजकीय वारसा परत मिळवतात का याची उत्तरे निवडणूक निकालानंतर मिळणार आहेत. सध्या त्यांच्यासमोर निवडणूक जिंकण्याचं आव्हान आहे.
झारखंड आंदोलनात आघाडीची भूमिका बजावणारे शहीद निर्मल महतो यांची सून सविता महतो देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. सविता झामुमोच्या चिन्हावर इचागढ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये पती सुधीर महतो यांच्या निधनानंतर सविता राजकारणात आल्या. आता या मतदारसंघात त्यांच्या विरोधात आजसू उमेदवार आहे. सविता महतो यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
वर्षभरात चार राज्यांत सरकार पण, ‘हा’ फॉर्म्युला हरियाणात नाहीच; भाजपाची स्ट्रॅटेजी काय?
संयुक्त बिहार-झारखंडचे दिग्गज नेते अवध बिहारी सिंह यांची सून दीपिका पांडे पुन्हा मैदानात आहेत. २०१९ मधील निवडणुकीत महगामा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. यानंतर त्यांना हेमंत सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली होती. दीपिका यांचे पती प्रोफेशनल क्षेत्रात कार्यरत आहेत. दीपिका राजकारणात येण्याआधी पत्रकारिता क्षेत्रात होत्या. युवक काँग्रेसच्या (Youth Congress) माध्यमातून राजकारणात आलेल्या दीपिका यांना २०१४ मध्ये गोड्डा जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले होते. दीपिका यांचा सामना जुने प्रतिस्पर्धी अशोक भगत यांच्याशी होणार आहे.