दलबदलू अन् वारसदारांची चांदी.. झारखंड भाजपाच्या पहिल्या यादीत आयारामांना लॉटरी!

दलबदलू अन् वारसदारांची चांदी.. झारखंड भाजपाच्या पहिल्या यादीत आयारामांना लॉटरी!

Jharkhand Assembly Elections 2024 : महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीची (Jharkhand Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. दुसरीकडे झारखंडमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. शनिवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बाबुलाल मरांडी, चंपई सोरेन, सुदर्शन भगत यांची नावे आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या विरोधात भाजपने मुनिया देवी यांना तिकीट दिले आहे. या यादीवर बारकाईने नजर टाकली तर लक्षात येईल की भाजपच्या या यादीत घराणेशाही आणि दलबदलू नेत्यांचा भरणा जास्त दिसत आहे.

भाजपच्या या यादीतील 66 पैकी 13 मतदारसंघात दलबदलू उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील पाच वर्षांच्या काळात भाजपात दाखल झालेली नेत्यांना तिकीट मिळालं आहे. इतकेच नाही तर या पहिल्या यादीत घराणेशाहीतील नेत्यांना प्राधान्य मिळालं आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे (Champai Soren) पुत्र बाबुलाल सोरेन, माजी केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांची पत्नी मिरा मुंडा, मधू कोडा यांची पत्नी गीता कोडा, माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून पौर्णिमा साहू यांना उमेदवारी दिली आहे.

घराणेशाहीला झुकतं माप

घराणेशाहीच्या राजकारणावर भाजप नेते सातत्याने टीका करतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही अनेकदा घरणेशहीवर जोरदार टीका केली आहे. असे असताना झारखंडमध्ये मात्र भाजपने या घराणेशाहीच्या वारसदारांनाच उमेदवारी दिली आहे. झारखंड मुक्ती मोर्चातून (JMM) नुकतेच भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे पुत्र बाबुलाल सोरेन यांना घाटशिला मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (Shibu Soren) यांची सून सीता सोरेन यांनाही भाजपने जामताडा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. सीता सोरेन यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून रघुबर दास यांची सून पौर्णिमा साहू मैदानात आहेत.

वर्षभरात चार राज्यांत सरकार पण, ‘हा’ फॉर्म्युला हरियाणात नाहीच; भाजपाची स्ट्रॅटेजी काय?

बाघमारा मतदारसंघातून खासदार धुल्लू महतो यांचे बंधू शत्रुघ्न महतो यांना तिकीट मिळालं आहे. पोटका मधून अर्जुन मुंडा यांची पत्नी मिरा मुंडा यांना उमेदवारी मिळाली आहे. झरिया मतदारसंघातून माजी आमदार संजीव सिंह यांची पत्नी रागिनी सिंह यांना तिकीट मिळालं आहे. सिमरिया मधून माजी आमदार किशन दास यांचे पुत्र उज्ज्वल दास तर सिंदरीमधून इंद्रजित महतो यांची पत्नी तारा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे.

उमेदवारी दलबदलूही मागे नाहीत

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवार मधून निवडणूक रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी मरांडी यांनी आपला पक्ष झारखंड विकास मोर्चा भाजपात विलीन केला होता. दोन महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झालेले झामुमोचे माजी आमदार लोबिन हेंब्रम यांना भाजपने बोरियो मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.

शिकारीपाडा मतदारसंघातून भाजपने परितोष सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपात येण्याआधी परितोष झारखंड विकास मोर्चामध्ये होते. परितोष यांना मरांडी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांना भाजपने जामताडामधून तिकीट दिले आहे. याआधी सीता सोरेन यांनी दुमका मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

हरियाणातला निर्णय पण, मेसेज महाराष्ट्र अन् झारखंडला; भाजपनं नेमकं काय केलं?

झारखंड मुक्ती मोर्चातून राजकारणाला सुरूवात करणारे देवेंद्र कुंवर यांना भाजपने जरमुंडी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्याने कुंवर नाराज झाले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपनेही त्यांना याच मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. याव्यतिरिक्त भाजपन अमित यादव, मनोज यादव, रोशन लाल चौधरी, मंजू देवी, बाबुलाल सोरेन, चंपई सोरेन, गीता कोडा आणि कमलेश कुमार सिंह या दलबदलू नेत्यांना भाजपने तिकीट दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube