काय सांगता! तब्बल 10 लाख श्वानांना लावणार मायक्रोचीप, प्लॅन तयार; वाचा, का घेतला निर्णय..
रस्त्यांवर फिरणाऱ्या जवळपास दहा लाख भटक्या श्वानांच्या शरीरावर मायक्रोचीप लावण्यात येणार आहे.

Delhi Government Big Decision on Stray Dogs : देशात सर्वत्रच भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. या श्वानांकडून माणसांवर आणि लहान मुलांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारी यंत्रणा मात्र अपयशी ठरत आहेत. लहान आणि मोठ्या शहरांत ही समस्या उग्र होत आहे. देशाची राजधानी दिल्ली शहरात तर भटक्या श्वानांना माणसांच जगणेच संकटात टाकले आहे. या समस्येवर प्रशासनाकडून अद्याप मार्ग निघालेला नाही. ही समस्या कायम असतानाच दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या जवळपास दहा लाख भटक्या श्वानांच्या शरीरावर मायक्रोचीप लावण्यात येणार आहे.
भटक्या श्वानांची संख्या किती (Stray Dogs) आहे याचा अंदाज घेता येत नाही. परंतु, मायक्रोचीप बसवल्याने ही समस्या राहणार नाही. त्यांच्या संख्येबरोबरच त्यांच्या ठिकाणांचाही पत्ता यातून मिळेल. रेबीज सारख्या घातक आजारावर नियंत्रण मिळवण्यातही मदत मिळणार आहे. दिल्ली अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या आज झालेल्या बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. पुढील दोन वर्षात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
भटक्या श्वानांना पकडून आत टाका; विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश
या माध्यमातून श्वानांचे आरोग्य आणि त्यांची संख्या यांवर नजर ठेवता येईल. तसेच रेबीज सारख्या घातक आजारावर नियंत्रण मिळवता येईल. मंत्री कपिल मिश्रा यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. या बैठकीत पशुपालन विभाग, एनडीएमसी आणि एमसीडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यूएनडीपी सोबत मिळून दिल्लीतील जवळपास 10 लाख भटक्या श्वानांना मायक्रोचीप लावण्यात येईल.
रेबीज नियंत्रणासाठी लवकरच नवा प्लॅन
या चीपच्या माध्यमातून श्वानांची ओळख, लसीकरण आणि त्यांचे लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. याद्वारे रेबीज नियंत्रण आणि श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करता येईल. 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन आहे. या गोष्टीचा विचार करून दिल्ली सरकार लवकरच रेबीज नियंत्रणासाठी स्टेट अॅक्शन प्लॅन आणणार आहे. यामध्ये श्वानांच्या लसीकरणाला डिजिटल देखरेखीशी जोडण्यात येणार आहे. तसेच श्वानदंशाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी श्वानांची गणना आणि त्यांच्यावर देखरेखीची प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
Rabies Day : कुत्र्याचं चावणं धोकादायकच! जाणून घ्या, रेबीज लस निर्मितीची धाडसी कथा..