Rabies Day : कुत्र्याचं चावणं धोकादायकच! जाणून घ्या, रेबीज लस निर्मितीची धाडसी कथा..
World Rabies Day 2024 : रेबीज आजाराबाबत जनमानसात जागरुकता आणणे महत्वाचे आहे. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव रोखणेही तितकेच महत्वाचे आहे. या दोन्ही उद्देशांचा विचार करून दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन (World Rabies Day 2024) पाळला जातो. ग्लोबल अलयांस फॉर रेबीज कंट्रोल (GARC) मार्फत सर्वात प्रथम या दिवसाची सुरूवात करण्यात आली होती. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून यास (World Health Organisation) मान्यता दिली जाते. या दिवसाची सुरुवात सन २००७ मध्ये ग्लोबल अलायंस फॉर रेबीज कंट्रोल संस्थेने केली होती. रेबीज आजाराला आळा घालण्यासाठी जगभरात काम करणारा हा गट आहे.
लुई पाश्चर यांच्या (Louis Pasteur) पुण्यतिथीनिमित्त २८ सप्टेंबर हा दिवस निवडण्यात आला होता. लुई पाश्चर यांनी सर्वात आधी रेबिजवर लस शोधून (Anti Rabies Vaccine) काढली होती.
रेबीज आजाराच्या धोक्यांची माहिती लोकांना देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. रेबीज हा एक घातक आजार आहे आणि हा आजार प्रामुख्याने कुत्र्यांच्या चाव्याने माणसात पसरतो. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य आरोग्य संस्था या दिवसाचे समर्थन करतात. रेबीजचा प्रादुर्भाव रोखणे आणि या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी काय करायला हवे याची माहिती लोकांना दिली जाते. आज याच निमित्ताने आम्ही तुम्हाला इतिहासातील एक गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होताल.
ही गोष्ट फ्रान्समधील अलझाक (France) शहरातील नऊ वर्षांच्या मुलाची आहे. या मुलाचे नाव जोसेफ मेईस्टर होतं. ६ जुलै १८८५ या दिवशी त्याला एका कुत्र्याने चावा घेतला. १८८५ च्या काळात एखादं पिसाळलेलं कुत्रं चावणं म्हणजे तुम्ही काही दिवसांचेच सोबती असा अर्थ घेतला जात होता. रेबीज एक अत्यंत घातक व्हायरसपासून होणारा आजार असल्याने त्यावेळी हा आजार अतिशय जीवघेणा मानला जात होता. त्याच्या घरचे सगळे काळजीत पडले होते. अशातच त्याच्या आईला बातमी कळली की एक शास्त्रज्ञ आहे जो अशा पिसाळलेल्या कुत्र्यांना पाळतो आणि त्यांच्या रक्तापासून इंजेक्शन तयार करतो.
या इंजेक्शनपासून लोक बरे होतात अशी अफवा त्या दिवसांत पसरली होती. या मुलाच्या आईमे काहीच विचार न करता थेट पॅरिस (Paris) गाठले. ज्यावेळी तिने या शास्त्रज्ञांची भेट घेतली तेव्हा त्यालाही आनंद झाला. कारण त्याने लस तर बनवली होती पण या लसीचा ह्युमन ट्रायल काही घेतला नव्हता. त्यामुळे या लसीचा परिणाम माणसावर कसा होईल याचा त्यांना अंदाज नव्हता. यानंतर त्यांनी या मुलावर उपचार सुरू केले. या वैज्ञानिकाचं नाव होतं डॉक्टर लुई पाश्चर होते. त्यांच्या या संशोधनाने मानव आणि प्राणी दोघांचे संरक्षण होऊ शकले.
रेबीज दिनाची थीम
आंतरराष्ट्रीय रेबीज दिन २०२४ या दिवसासाठी यंदा रेबिजच्या मर्यादा तोडा अशी थीम निश्चित करण्यात आली आहे. रेबीज आजाराला आळा आणि सध्याच्या मर्यादा तोडून आणखी पुढे मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही थीम निवडण्यात आली आहे.
Pet Dogs : पाळीव प्राण्यांपासून दूर राहणे सुरक्षित? संशोधनात ‘ही’ माहिती उघड
जागतिक रेबीज दिनाचा इतिहास
रेबीज आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सन २००७ मध्ये पहिल्या जागतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यावेळी दरवर्षी या आजारामुळे दहा हजार मृत्यू होऊ लागले त्यावेळी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. विकसनशील देशांत हे अभियान आधिक प्रभावी पद्धतीने राबवण्यात आले. या कार्यक्रमाने सुलभ पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट आणि पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावर भर दिला.
जागतिक रेबीज दिनाचे महत्त्व
रेबीज या आजाराला आळा घालता जाऊ शकतो. तरी देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजारामुळे दरवर्षी ५९ हजार लोकांचा मृत्यू होत आहे. आफ्रिका आणि आशिया खंडातील ग्रामीण भागात याबाबत जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २०३० पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे.