सुपारीमुळे कॅन्सरचा धोका? WHO चा अहवाल खरा की खोटा; भारतानं चॅलेंज स्वीकारलं!

WHO Report on Areca Nut : भारतीय संस्कृतीमध्ये सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानात सुपारी खाल्ली जाते हे तर तुम्हाला माहितीच असेल. आपल्याकडे औक्षणाच्या ताटातही सुपारी ठेवण्याची पद्धत आहे. धार्मिक कारणांसाठी सुपारीचा वापर केला जातो. पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या सुपारीमुळे कर्करोग होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भारतात कर्नाटकात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच देशातून सुपारीची निर्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे सरकारने या अहवालानंतर आता पावले उचलायला सुरूवात केली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक देश आहे. भारत एकूण जागतिक उत्पादनापैकी सुमारे 63% सुपारीचे उत्पादन करतो. 2023-24 मध्ये भारताने सुमारे 14 लाख टन सुपारीचे उत्पादन केले. कर्नाटक हे देशातील सर्वात मोठे सुपारी उत्पादक राज्य आहे. कर्नाटकात 6.76 लाख हेक्टर क्षेत्रातून 10 लाख टन सुपारीचे उत्पादन झाले. त्यानंतर केरळ, आसाम, मेघालय, मिझोरम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. पीआयबीच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 60 लाख लोक सुपारी लागवडीवर अवलंबून असल्याचा अंदाज आहे.
भारत सुपारीचा निर्यातदार
भारत जागतिक बाजारात सुपारी विकतो. 2023-24 या वर्षात भारताने 10,637 टन सुपारी निर्यात केली, ज्याची किंमत सुमारे 400 कोटी रुपये आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल चिंताजनक आहे. याचा परिणाम केवळ या शेतकऱ्यांवरच होणार नाही तर भारतातील सुपारी बाजारपेठेवरही होईल.
फ्रिजमध्ये अन्न किती दिवस सुरक्षित? चुकीच्या पद्धतीने आरोग्य धोक्यात
केंद्रीय कृषिमंत्र्यांची बैठक
सुपारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाबाबत दिल्लीतील कृषी भवन येथे एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मंत्री एचडी कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री, सुपारी उत्पादन क्षेत्रातील खासदार आणि विविध विभाग आणि मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुपारी पिकाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालाचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘या अहवालामुळे कर्नाटकात पिकणाऱ्या सुपारीबाबत काही गोंधळ निर्माण झाला आहे. हे गैरसमज दूर करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांची एक टीम संशोधन करत आहे आणि टीमला निर्धारित वेळेत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत’.
‘भारतातील लोक फार पूर्वीपासून जवळजवळ प्राचीन काळापासून सुपारी वापरत आहेत आणि देशातील प्रत्येक शुभ प्रसंगी सुपारीचा वापर केला जातो. सुपारीच्या झाडांचा नाश करणाऱ्या एरोलेट मिल्ड्यू या आजारावर उपचार करण्यासाठी वैज्ञानिक पथके काम करत असल्याचे त्यांनी सांगितले’.
‘सुपारी हे एक महत्त्वाचे पीक आहे, ज्याला भारताच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान आहे. त्यात विविध अल्कलॉइड्स असल्याने ते आयुर्वेदिक आणि पशुवैद्यकीय औषधांमध्ये देखील वापरले जाते. मी स्वतः शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या पथकाची भेट घेईल. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुपारी लागवडीच्या विकासासाठी एक रोडमॅप तयार केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री चौहान यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालात काय
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि त्यांची कर्करोग संशोधन संस्था IARC (इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर) यांनी 2024 मध्ये सुपारीवरील एक अहवाल सादर केला. या अंतर्गत सुपारीला “मानवांसाठी कर्करोगजन्य” श्रेणीत ठेवण्यात आले. WHO च्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’च्या अभ्यासानुसार जगातील तोंडाच्या कर्करोगाचे प्रत्येक तीनपैकी जवळजवळ एक प्रकरण धूरविरहित तंबाखू आणि सुपारीच्या सेवनाशी संबंधित आहे.
डेंग्यू ते मलेरिया… डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासून संरक्षणाचे घरगुती उपाय
धूररहित तंबाखू आणि सुपारी जगभरात अनेक स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर तोंडाच्या कर्करोगासह विविध आजारांशी संबंधित आहे, असे आयएआरसी आणि लॅन्सेट ऑन्कोलॉजीच्या कर्करोग देखरेख शाखेतील शास्त्रज्ञ हॅरिएट रामागे यांनी अहवालात म्हटले आहे.
जगभरात सुमारे 30 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात आणि सुमारे 60 कोटी लोक सुपारी खातात. निकोटीन, अल्कोहोल आणि कॅफिननंतर सुपारी हा जगातील सर्वात लोकप्रिय सायकोअॅक्टिव्ह पदार्थांपैकी एक आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये जगभरात तोंडाच्या कर्करोगाच्या 3 लाख 89 हजार 800 प्रकरणांपैकी अंदाजे 1 लाख 20 हजार 200 प्रकरणे (सुमारे 30.8%) थेट धूरविरहित तंबाखू आणि सुपारीशी संबंधित होती. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार दक्षिण आशियामध्ये धूरविरहित तंबाखू आणि सुपारीच्या वापरामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये देशात तोंडाच्या कर्करोगाची 83,400 प्रकरणे नोंदवली गेली.