Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका? नवी कॅन्सर लस किती गेमचेंजर ठरेल?
नव्या कॅन्सर लसीला ‘EnteroMix’ असे नाव देण्यात आले आहे. ती mRNA प्लॅटफॉर्मवर आधारित असून कोविड-19 लसीप्रमाणेच आहे.

New cancer Vaccine EnteroMix : कॅन्सर या भयंकर आजाराविरोधात जगभरात संशोधन सुरू आहे. अशातच रशियातून एक दिलासादायक बातमी समोर आलीय. रशियातील संशोधकांनी कॅन्सरविरोधी लस तयार करण्यात यश मिळवल्याचा दावा केलाय. या लसीच्या पहिल्या क्लिनिकल चाचण्या (फेज-1 ट्रायल) यशस्वी ठरल्या असून, रुग्णांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. तज्ज्ञांच्या मते ही लस कॅन्सरच्या उपचारपद्धतीत नवी क्रांती घडवू शकते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात भारतातील सुमारे 11 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, असं आढळलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दर 9 ते 10 व्यक्तींमध्ये एकाला आयुष्यभरात कॅन्सर होण्याचा धोका आहे. 2024 मध्ये देशात सुमारे 16 लाख नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर 9 लाखांहून अधिकांनी जीव गमावला. औषधं आणि उपचारांच्या प्रचंड खर्चामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत असताना ही नवी लस आशेचा किरण ठरू शकते.
‘एंटरॉमिक्स’ – mRNA तंत्रावर आधारित लस
या नव्या कॅन्सर (cancer) लसीला ‘EnteroMix’ असं नाव देण्यात आलंय. ती mRNA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कोविड-19 लसीप्रमाणेच रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित करण्याचे काम करते. या पद्धतीत शरीराला सूक्ष्म mRNA मॉलिक्यूलद्वारे संदेश दिला जातो, ज्यामुळे पेशी विशिष्ट प्रोटीन तयार करतात. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरच्या पेशींना ओळखून त्यांच्यावर हल्ला करू लागते. पहिल्या फेजच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये (Russia) ही लस 100 टक्के सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दिसलंय. रुग्णांना कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. उलट ट्युमरचा आकार कमी होऊ लागला. त्याचा वाढीचा वेग मंदावला. त्यामुळे हा शोध वैद्यकीय जगासाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
किमोथेरपी-रेडीएशनपेक्षा अधिक परिणामकारक?
कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी अनेकदा किमोथेरपी किंवा रेडीएशन घ्यावे लागते. हे उपचार अत्यंत कष्टदायक असतात. ते शरीरावर गंभीर दुष्परिणाम करतात. अशा वेळी रशियाने विकसित केलेल्या या नव्या लसीकडून मोठी आशा निर्माण झाली आहे. या लसीचे वैशिष्ट्य असे की, ती प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे तयार केली जाते. रुग्णाच्या ट्युमरमधील गुणसूत्रांची ओळख करून त्यानुसार ही लस बनवली जाते. त्यामुळे ती थेट त्या रुग्णाच्या कॅन्सर पेशींवर परिणामकारक ठरते.
याशिवाय, mRNA प्लॅटफॉर्म असल्यामुळे ही लस तयार करण्याची प्रक्रिया झपाट्याने पार पडते. पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या लसीचे दुष्परिणाम खूपच कमी असल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णांना जास्त वेदना न होता चांगला आराम मिळू शकतो. त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होऊ शकते.
आशेचा किरण
आता या लसीची पुढील फेज-2 आणि फेज-3 चाचणी करण्यात येणार आहे. जर त्या चाचण्यांतही ही लस तितकीच सुरक्षित आणि प्रभावी ठरली, तर भविष्यात कॅन्सर हा जीवघेणा रोग न राहता साध्या आजारासारखा सहज बरा करता येईल. भारतासारख्या देशात, जिथे कॅन्सरवरील औषधे अत्यंत महाग आहेत, तिथे ही लस रुग्णांसाठी नवीन आशेचा किरण ठरू शकते. योग्य वेळी मिळाल्यास रुग्णांना आयुष्याची नवी संधी मिळू शकते.
सध्या ही लस विशेषतः कोलोरेक्टल कॅन्सर, ग्लियोब्लास्टोमा (मेंदूचा कॅन्सर) आणि ऑक्युलर मेलेनोमा (डोळ्यांचा कॅन्सर) यांच्यावर वापरण्याची योजना आहे. तज्ज्ञांच्या मते, ही लस व्यापक प्रमाणावर यशस्वी ठरली तर कॅन्सर रुग्णांना चांगल्या जीवनमानाची आणि दीर्घायुष्याची खरी हमी मिळू शकते.