J&K launches QR code-based identification system for all tourism stakeholders in Pahalgam : गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना (25 पर्यटक आणि 1 स्थानिक) आपला जीव गमवावा लागला होता. या जखमेच्या खुणा अजूनही ताज्या असतानाच, प्रशासनाने पर्यटकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था अभेद्य करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ (QR Code) आधारित जगातील सर्वात मोठी ओळख मोहीम हाती घेतली आहे.
काय आहे ही नवीन प्रणाली?
पहलगाममध्ये आता केवळ ओळखपत्रावर काम चालणार नसून, प्रशासनाने येथे काम करणाऱ्या सुमारे 25000 लोकांच्या डिजिटल ओळखीचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये घोडेवाले (पोनी हँडलर), टॅक्सी चालक, फोटोग्राफर, स्थानिक गाईड, फेरीवाले आणि दुकानदार यांचा समावेश आहे. आतापर्यंत 7 हजाराहून अधिक लोकांना हे विशेष ‘क्यूआर कोड’ वितरित करण्यात आले आहेत.
पर्यटकांना एका स्कॅनवर कोणती माहिती मिळणार?
हा क्यूआर कोड कोणत्याही स्मार्टफोनवर किंवा गुगल लेन्सच्या मदतीने स्कॅन करता येणार आहे. स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक. संबंधित व्यक्तीचा नोंदणी तपशील आणि व्यवसायाचे स्वरूप. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीची पोलीस चौकशी झाली आहे की नाही, हेदेखील यातून स्पष्ट होणार आहे. तसेच यात त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती (सुरक्षेचे निकष पाळून) यात समाविष्ट असेल.
पडताळणीची प्रक्रिया अत्यंत कडक
आता पेहलगाममधील व्यावसायिकांना दिले जाणारे क्यूआर कोड मिळवणे इतके सोपे नाहीये. यासाठी सेवा पुरवठादाराला प्रथम ‘खिदमत’ सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर पोलीस त्याची संपूर्ण पार्श्वभूमीची (Background Check) बारकाईने तपासणी करतात. ज्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल आहे, त्याला हा कोड दिला जात नाही. बैसरन हल्ल्यानंतर अनेक स्थानिक लोक संशयाच्या भोवऱ्यात होते, त्यामुळेच एनआयए (NIA) आणि स्थानिक पोलिसांनी या प्रक्रियेत अत्यंत कडक निकष लावले आहेत.
पर्यटकांच्या मनात विश्वासाचे वातावरण
गेल्या वर्षीच्या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता हा क्यूआर कोड केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नाही, तर पर्यटकांच्या स्वतःच्या समाधानासाठीही उपलब्ध आहे. एखादा पर्यटक जेव्हा घोड्यावर बसेल किंवा गाईडची मदत घेईल, तेव्हा तो स्वतःहून त्या व्यक्तीचा क्यूआर कोड स्कॅन करून तो अधिकृत आहे की नाही, हे तपासू शकेल.
स्थानिक सेवा पुरवठादारांकडून स्वागत
या मोहिमेचे स्थानिकांनीही स्वागत केले आहे. स्थानिक सेवा पुरवठादार गुलाम हसन यांच्या मते, “आता आमच्याकडे डिजिटल ओळख असल्याने पर्यटकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे. यामुळे बाहेरील अनधिकृत लोकांपासून आणि बनावट सेवा पुरवठादारांपासून पर्यटकांचे रक्षण होईल.”
सध्या पहलगाममधील 17-18 प्रमुख पर्यटन स्थळांवर ही यंत्रणा कार्यान्वित असून, पर्यटनात पारदर्शकता आणून दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा याचा मुख्य हेतू आहे. पहलगाम पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार केवळ काश्मीरच नव्हे, तर देशातील पर्यटन क्षेत्रासाठी एक आदर्श सुरक्षा मॉडेल ठरण्याची शक्यता आहे. या ‘डिजिटल कवचामुळे’ आता पर्यटकांना निसर्गाचा आनंद अधिक निर्भयपणे घेता येणार आहे.
