Download App

‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य’; न्यायाधिशांनी निरोप समारंभाच्या भाषणात केलं जाहीर

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं. 

Justice Chitta Ranjan Dash : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी नुकतीच निवृत्ती घेतली. दरम्यान, आपल्या सेवा निवृत्ती कार्यक्रमात त्यांनी जे भाषण केलं ते देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. चित्तरंजन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांचं हे भाषण मोठ्या प्रमाणत व्हायरलं झालं.

 

मग ते ढोंग होईल

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘काही लोकांना हे आवडणार नाही. पण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. हे मला या ठिकाणी मान्य करावं लागेल’ त्यानंतर त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं. या विधानाची मोठी चर्चा सुरू झाल्यापासून त्यांना पुन्हा पुन्हा या विषयावर विचारण्यात आलं. त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत ‘आरएसएसशी असलेलं आपलं नातं न सांगणं म्हणजे ढोंग होईल’, असं म्हणत आपण केलेल्या विधानावर ते ठाम आहोत असं त्यांनी सांगितलं.

 

वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले ?

निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मी जे बोललो ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत उत्स्फूर्तपणे माझ्या मनात आलं आणि मी त्याबद्दल बोललो. मी माझ्या आयुष्यात असलेल्या लोकांचे आभार मानले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेलं नातं सांगितलं नसतं तर ते म्हणजे ढोंग झालं असतं. देवाने मला आरएसएसवर बोलण्याची प्रेरणा दिली. आरएसएस हे माझं मूळ आहे. पण मी 37 वर्षांपूर्वी त्यापासून वेगळं झालो होतो. मात्र, मी जर ते स्वीकारलं नसतं तर हा ढोंगीपणा झाला असता’, असं चित्तरंजन दास यांनी म्हटलं आहे.

 

निरोप समारंभात काय म्हणाले होते?

‘काही लोकांना हे आवडणार नाही. मात्र, आज या ठिकाणी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. मी त्या संघटनेला खूप काही देणे लागतो. मी संघाचा खूप ऋणी आहे. मी लहानपणापासून ते मोठा होईपर्यंत तेथे होतो. धाडस, प्रामाणिकपणा, सारखा दृष्टीकोन, देशभक्ती, कामाची भावना हे सर्व मी तेथे शिकलो. मात्र, माझ्या कामामुळे 37 वर्षांपासून आरएसएसपासून दूर आहोत. त्याचा उपयोग मी कधी माझ्या कारकि‍र्दीत केला नाही. मी संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही. कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना समान वागणूक दिली. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, साम्यवादी असो किंवा भाजपाचा, काँग्रेसचा किंवा तृणमूल काँग्रेसचा सदस्य असो, अशा सर्वांना समान वागणूक दिली’, असं चित्तरंजन दास यांनी आपल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात म्हटलं आहे.

follow us