धर्मस्थळे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पेरणी!

  • Written By: Published:
धर्मस्थळे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पेरणी!

विष्णू सानप

पुणे : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तीन दिवसीय बैठक पार पडत आहे. यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सुरक्षा आदी मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासाठी देशभरातील 36 संघटनांचे 267 पदाधिकारी सहभागी झाले असून या बैठकीचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि सहकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे (Dattatraya Hosbale) यांच्या हस्ते करण्यात आला.

या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात देशभरातून संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. या बैठकीतून वेळ काढून यातील काही प्रमुख पुण्यातल्या महत्वाच्या शैक्षणिक संस्था आणि धर्मस्थळांना भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नागरिकांशी भेटीगाठी, चर्चा असे त्याचे स्वरुप आहे.

देशात प्रतिष्ठित असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये ‘समान नागरी कायदा’ या विषयावर ‘प्रज्ञा प्रवाह’चे जे. नंदकुमार यांचे व्याख्यान झाले. येत्या रविवारी (ता. 17 सप्टेंबर) अयोध्येतील श्रीराम मंदिराचे अध्यक्ष चंपतारायजी हे सारसबाग येथील गणपती मंदिरात सकाळी आठ वाजता दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळी ते मंदिरातील भाविकांशी संवाद साधणार असून अयोध्यातील भव्य राम मंदिर बांधकामाविषयी विस्तृत माहिती देणार आहेत.

काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरयाsss’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार 

जे. नंदकुमार यांचे देशातील नामांकित आय. एल. एस लॉ कॉलेज पुणे येथे ‘नॅशनल इंटिग्रेशन, रोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड इन्स्टिट्यूशन’ या विषयावर व्याख्यान झाले. स्वावलंबी भारत अभियानाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी एम. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस अर्थात आयएमसीसी येथील तरुणाईपुढे ‘उद्योजकतेचे मर्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. भगवती प्रकाश शर्मा यांनी ‘परकीय व्यापार’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे व्याख्यान आबेदा इनामदार सीनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांनी आयोजित केले होते. तसेच, डॉ. उदय जोशी यांनी नेस वाडिया कॉलेज मधील विद्यार्थ्यांना ‘भारतातील सहकार क्षेत्र : संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान दिले. तर पुण्यातील एमवायएसबीए या संस्थेमध्ये सतीश कुमार यांनी ‘उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे सबलीकरण’ या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube