Download App

एका बेटावरून तामिळनाडूत निवडणुकीचे वातावरण तापणार? भाजपने काँग्रेसला खिंडीत गाठले !

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Katchatheevu Island issue- BJP Vs Opposition : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया (I.N.D.I.A) आघाडीमध्ये घमासान सुरू झालंय. मात्र कधीकाळी भारताचा भाग असलेला आणि आता श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या कच्चाथीवू बेटावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसला घेरलंय. कच्चाथीवूचा ( Katchatheevu) वाद नेमका आहे तरी काय? इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला का दिलं? या बेटावरून भाजपला तामिळनाडूत राजकीय फायदा होईल काय? हेच जाणून घेऊयात..

कच्चाथीवू बेट कुठं आहे? आणि त्याचं महत्त्व काय?

कच्चाथीवू बेट हे श्रीलंकेच्या नेदुनथीवू आणि भारताच्या रामेश्वर या भागातंय. हे बेट 285 एकर इतकंय. या बेटाची लांबी 1.6 किलोमीटरंय. भारतीय किनारपट्टीवरून 33 किलोमीटर लांब असलेलं हे बेट श्रीलंकेतील जाफनापासून 62 किलोमीटर इततं लांबय. या बेटाचा वापर दोन्ही देशातील मच्छिमार करत होते. हे बेट तामिळनाडूतील मच्छिमारांसाठी महत्त्वाचं आहे. या बेटाला वेगळा इतिहास देखील आहे. हे बेट श्रीलंकेतील जाफना साम्राज्याच्या नियंत्रणात होतं. ब्रिटिशकाळात हे बेट मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. बेटावर 110 वर्षांपूर्वी सेंट अँथनी चर्च उभारण्यात आलंय. इथं रामेश्वरममधील हजारो लोक प्रार्थना करायला जातात. त्यामुळं धार्मिकदृष्टा हे बेट महत्त्वाचंय.

इंदिरा गांधींनी हे बेट श्रीलंकेला का दिलं?

त्याचं झालं असं की, 1921 मध्ये भारत आणि श्रीलंका दोघांनी मासेमारी करण्यासाठी या बेटावर दावा केला. मात्र 1974 पर्यंत हा वाद मिटलाच नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत आणि श्रीलंकेचा सागरी सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका करारानुसार इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिलं. या बेटाला काही राजनैतिक महत्त्व नाही, असं समजून भारतानं हे बेट श्रीलंकेला देऊन टाकलं. श्रीलंकेबरोबर राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तेव्हा सांगण्यात आलं. या करारानुसार भारतीय मच्छिमारांना या बेटावर जाण्यास परवानगी होती. तिथं आपलं जाळं सुकवणं त्याचबरोबर आराम करण्यासाठी भारतीय मच्छिमार जात होते. मात्र 1976 मधील भारतातील आणीबाणीच्या काळात आणखी एक करार झाला. त्या विशेष आर्थिक क्षेत्रात दुसऱ्या देशातील मच्छिमारांना मासेमारी करण्याला बंदी घातली होती. आणि त्याचा फटका थेट भारतीय मच्छिमारांना बसला.

‘लाईट्स, कॅमेरा…’; सनी लिओनने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला एक्स 5’वर होणार रिलीज


तामिळनाडूतून तीव्र विरोध, पुन्हा बेट भारताच्या ताब्यात घेण्याची मागणी

इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला तामिळनाडूतून तीव्र विरोध झाला. तामिळनाडू विधानसभेचा विचार न घेताच हे बेट श्रीलंकाला देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळं इंदिरा गांधी यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनं झाली. तर 1991 मध्ये श्रीलंकेत गृहयुद्ध पेटलं होतं. त्यानंतर पुन्हा हे बेट भारतानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी तामिळनाडूतून जोर धरु लागली. तर 2008 मध्ये जयललिता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या. पुढं या बेटाबद्दल सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. त्यात तत्कालीन अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी कच्चाथिवू हे बेट एका करारानुसार श्रीलंकेला दिलेलं आहे. आज आपण ते परत कसं घेऊ शकतो? ते परत घ्यायचं असेल तर युद्ध करावं लागेल, असं सांगितलं. तर मागच्या वर्षीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. या बेटावर तमिळ लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत, हे बेट पुन्हा भारताला परत करावं, याबद्दल श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासोबत चर्चा करावी, अशी मागणी स्टॅलीन यांनी केली होती.

मी वाट पाहतोय! महादेव जानकरांसाठी मोदींचा खास संदेश; फडणवीसांनी जाहीर सभेतच सांगितला


श्रीलंकेकडून आता भारतीय मच्छिमारांवर कारवाई

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी मासे मिळतात. त्यामुळं भारतीय मच्छिमार हे आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन कच्चाथिवू या बेटावर जातात. भारतीय मच्छिमारांनी आंतरराष्ट्रीय सिमांचं उल्लंघन केल्याची कारणं देऊन, श्रीलंकेचे सैनिक त्यांना ताब्यात घेतात. या भागातील मासे आणि इतर जल जलचरांमध्ये घट झालीय. त्यामुळं मच्छिमारांच्या जीवनावर मोठा परिणाम देखील झालाय, असं कारणही श्रीलंकेकडून देण्यात येतं.

आता निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळला

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के.अन्नामलाई यांनी कच्चाथीवूबद्दल आरटीआय दाखल करुन माहिती मागवली. त्यात इंदिरा गांधी यांनी करारातून हे बेट लंकेला दिलं, अशी कागदपत्रं मिळाली. त्या आधारावरुन अन्नामलाई यांनी एक ट्वीट केलं. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्टॅलिन इंडिया आघाडीत आहेत. आणि भाजपला दक्षिणेत म्हणावा तसा जम बसलेला नाहीय. त्यामुळं स्टॅलिन आणि काँग्रेसला टार्गेट करुन, तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी, भाजपनं हा मुद्दा पुढं केल्याची चर्चा सुरु झालीय.

याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी आपले मत व्यक्त केलंय. ते म्हणालेत, मुळातच, शेजारील राष्ट्राशी संबंधित मुद्द्यांवर सरकारने काही निवेदनं करण्यापूर्वी त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्याच काय परिणाम होऊ शकतो? हे पाहायला पाहिजे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, अशा स्वरूपांचं निवेदन करणे, हे अतिशय अयोग्य आहे. कच्चाथिवूच्या संदर्भात करण्यात आलेल्या निवेदनामुळं श्रीलंकेसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. मूळात श्रीलंकेमध्ये चीनचा प्रभाव वाढतोय. अशा वेळी या प्रकारच्या निवेदनामुळं चीनला मदत होऊ शकते, हे देखील विसरता येणार नाही…

follow us

वेब स्टोरीज