Live-in couples will now be counted as married couples : भारताच्या आगामी जनगणनेत एक मोठा आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडप्यांची नोंद विवाहित म्हणून केली जाणार आहे. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीत हा बदल समाविष्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ कायदेशीर विवाह केलेल्या व्यक्तींनाच विवाहित श्रेणीत गणले जात होते. मात्र, बदलत्या सामाजिक वास्तवाचा विचार करून सरकारने लिव्ह इन जोडप्यांनाही विवाहितांच्या समकक्ष मानण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामागील प्रमुख कारणे काय?
सर्वप्रथम, सामाजिक सुरक्षेचा मुद्दा. लिव्ह इन संबंधात राहणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना अधिकृत ओळख मिळावी, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. दुसरे म्हणजे, अचूक आकडेवारी. देशात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची योग्य नोंद झाल्यास लोकसंख्येचे आणि कौटुंबिक रचनेचे अधिक वास्तव चित्र सरकारसमोर येऊ शकते. तिसरे म्हणजे, न्यायालयीन संदर्भ. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये दीर्घकाळ लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना विवाहासारखे काही अधिकार दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देखील हा निर्णय घेतला गेल्याचे मानले जात आहे.
अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले
2027 च्या जनगणनेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे डिजिटल स्वरूप, यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. लिव्ह इन जोडप्यांच्या या समावेशामुळे जनगणनेच्या अर्जात देखील बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, हा निर्णय केवळ आकडेवारीपुरताच मर्यादित नसून, बदलत्या भारतीय समाजाच्या वास्तवाला मान्यता देणारा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
