Download App

दीड लाख तंबू, 1249 किमी पाइपलाइन.. ‘यूपी’तील कुंभमेळ्याचं मेगा नियोजन

तब्बल 12 वर्षांनंतर कुंभमेळा प्रयागराजच्या भूमीवर होत आहे. या धार्मिक मेळ्याची सविस्तर माहिती घेऊ या..

Mahakumbh in Uttar Pradesh : उत्तर प्रदेश भारतातील सर्वात मोठं राज्य. अयोध्या, मथुरा अन् वाराणसी अशी धर्मक्षेत्रे याच राज्यात आहेत. आता तब्बल 12 वर्षांनंतर सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणजेच कुंभमेळा प्रयागराजच्या भूमीवर होत आहे. प्रयागराज शहरातील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी या मेळा होत आहे. देश विदेशातून कोट्यावधी भाविक येथे हजेरी लावणार आहेत. या धार्मिक उत्सवाची मोठी तयारी उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येत आहे. या मेळ्यासाठी सरकारने काय नियोजन केलं आहे याची थोडक्यात माहिती घेऊ या..

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात देश विदेशातून तब्बल 43 कोटी तीर्थयात्री येतील असा अंदाज आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असून प्रयागराज, हरिद्वार (उत्तराखंड), नाशिक (महाराष्ट्र) आणि उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी आयोजित होतो. यंदा तब्बल बारा वर्षांनंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे.

कुंभमेळ्याची जय्यत तयारी

उत्तर प्रदेश सरकारने या मेळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मुलभूत सुविधांसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावर मेळा मैदाने तयार केली जात आहेत. या ठिकाणी भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 1 लाख 6 हजार तंबू, 400 किलोमीटरचे तात्पुरते रस्ते, 30 पुलांची निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे.

उत्तर प्रदेशात पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीची जमीन; शत्रूच्या संपत्तीची होणार विक्री..

वीज, पाणी अन् पर्यावरणाचा समतोल

कुंभमेळ्यासाठी वीज पुरवठ्यासाठी दोन नवीन सबस्टेशन्स आणि 66 नवे वीज ट्रान्सफॉर्मर्स उभारण्यात येणार आहेत. पाणी पुरवठ्यासाठी 1 हजार 249 किलोमीटर पाइपलाइन, 200 वॉटर एटीएम आणि 85 वॉटर बूथ सुरू करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी दीड लाख तात्पुरत्या स्वरुपाचे टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरणाकडेही लक्ष देण्यात येत आहे. हरित कुंभचा संदेश देण्यासाठी तब्बल तीन लाख वृक्षारोपण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. कुंभमेळ्या दरम्यान 13 हजार रेल्वे गाड्या धावणार आहेत. 7 हजार बस आणि जास्तीच्या बसस्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.

एआय टेक्नॉलीजीच्या मदतीने वॉच

एआय सक्षम कॅमेऱ्यांच्या मदतीने मेळ्यातील 95 टक्के गर्दीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. 744 तात्पुरते सीसीटीव्ही, 1107 कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे आणि 720 पार्किंग कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. पीक अवर्समध्ये दर मिनिटाला अपडेट मिळण्याची व्यवस्था होणार आहे. या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. कुंभमेळ्याच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी कंपन्यांना 3 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून सहा लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले.

Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी रेल्वेची पर्वणी, सुमारे ९९२ विशेष गाड्या सोडणार, ९९३ कोटींची तरतूद

follow us