Prayagraj Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ पर्व (Mahakubh 2025) मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यावधी भाविकांची रिघ लागली आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. परंतु, यातच आता येथील पाण्याबाबत एक धक्कादायक अहवाल उजेडात आला आहे. संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे. आता हा अहवाल नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलला पाठवण्यात आला आहे.
प्रदूषण मंडळाच्या या अहवालात म्हटले आहे की येथील पाण्यात फेकल कॉलीफॉर्मची पातळी खूप जास्त आहे. पथकाने अनेक ठिकाणांवरून पाण्याचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. महाकुंभात कोट्यावधी लोक स्नान करत आहेत. त्यामुळे पाण्यात फोकल कॉलीफॉर्मची पातळी वाढली आहे, असे कारण देण्यात आले आहे. जर नदीच्या पाण्यात फेकल कॉलीफॉर्म्सचे प्रमाण जास्त वाढलेले असेल तर यामुळे विविध जलजन्य आजार होण्याचा धोका असतो.
महाकुंभात 50 कोटी भारतीयाचं गंगास्नान, जाऊ न शकलेल्यांच्या घरी पवित्र जल; CM फडणवीसांनी केलं कौतुक
खरंतर या प्रकरणात एनजीटी न्यायालयात एक याचिका आधीच दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी महाकुंभ सुरू होण्याआधीच सुनावणी सुरू झाली होती. त्यामुळे अनेक अहवाल समोर आल्यानंतर देखील कार्यवाहीकडे दुर्लक्ष करण्यात आले याबद्दल नाराजी आहे. आता पुढील सुनावणीत युपीपीसीबी आणि मेंबर सेक्रेटरी यांनी स्वतः उपस्थित राहावे असे न्यायालयाने म्हटले आहे. संगमातील पाण्यावरून याआधीही वाद झाले आहेत. पाण्याच्या गुणवत्तेवर विरोधकांनीही संशय घेतला होता.
जियो ट्यूब फिल्ट्रेशन सिस्टीम मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे. माहितीनुसार, 6-8 जानेवारी आणि 18-19 जानेवारी 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये 7 जियोसिंथेटिक डीवॉटरिंग ट्यूब ठिकाणांचे निरीक्षण करण्यात आले होते. नमुना विश्लेषणात आढळून आले की सर्व सात जियो ट्यूब ठरवून दिलेल्या मानदंडांनुसार नाहीत.