Download App

वाहनांना नो एन्ट्री अन् VVIP पास रद्द.. महाकुंभातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचे 5 निर्णय

या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahakumbh Stampede : प्रयागराजमधील महाकुंभात बुधवारी चेंगराचेंगरी (Mahakumbh Stampede) झाली. या घटनेत तब्बल 30 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. गर्दी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाच मोठे निर्णय तत्काळ प्रभावाने घेण्यात आले आहेत. या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नानाचा योग होता. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री संगम तटावर प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीचा दबाव वाढल्याने बॅरिकेडिंग तुटून चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले. यातील 36 भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 24 भाविकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही.. अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?

पाच महत्वाचे निर्णय कोणते

संपूर्ण महाकुंभमेळा क्षेत्र आता नो व्हेईकल झोन घोषित, वाहनांना नो एन्ट्री

सर्व VVIP पास रद्द, विशेष पास असला तरी वाहनांना प्रवेश नाही

रस्त्यांचे वन वे मध्ये रुपांतर, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांवर एकेरी मार्ग लागू.

प्रयागराज जवळच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांना जिल्ह्याच्या सीमेवरच रोखणार.

4 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी

मेळा प्रशासनाने सांगितले की या बदलांचा उद्देश येथील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि भाविकांची सुरक्षितता हा आहे. प्रशासनाने हे जे काही निर्णय घेतले आहेत त्यांचे पालन भाविकांनी करावे. त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होईल.

सीएम योगी आदित्यनाथ भावूक..

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भावूक झाल्याचे दिसले. ही घटना आपणा सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. या घटनेची न्यायिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत. निवृत्त न्या. हर्ष कुमार आयोगाच्या अध्यक्ष असतील. त्यांच्या नेतृत्वात माजी डीजीपी वीके गुप्ता आणि आयएएस डीके सिंह या आयोगात सदस्य म्हणून काम करतील असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

Mahakumbh : आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, CM योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर 

या घटनेने मला खूप दु:ख झालं. सर्व मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. सुमारे ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. ३६ जखमींवर प्रयागराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य सरकारकडून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन आयोगाकडून चौकशी केली जाईल. तसेच ही समिती निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले

follow us