Download App

मणिपुरात परिस्थिती गंभीर! इंटरनेट ठप्प, संचारबंदी लागू; केंद्राने धाडले दोन हजार जवान

सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्यात इंटरनेट ठप्प आहे.

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून (Manipur Violence) आला आहे. आताही येथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात इंटरनेट ठप्प आहे. तसेच तीन जिल्ह्यांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंटरनेट आणि मोबाइल डेटा बंद करण्यासंदर्भात मणिपूर सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. मणिपूर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 15 सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळमध्ये हायटेक ड्रोनने हल्ला, दोन जणांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी 

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले, उपद्रवी लोकांचे द्वेषपूर्ण भाषण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसा पसरवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी याआधी सरकारने आरएएफचे जवान तैनात केले होते. तसेच संचारबंदी लागू करण्याचाही निर्णय घेतला होता.

यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत राज्यात सीआरपीएफचे जवान तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. जवळपास दोन हजार जवाने तैनात होणार आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. यासाठी राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता.

मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जखमी

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मात्र हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या परिस्थितीचा विचार करता इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ला 

मणिपुरातील हल्ल्यांची पद्धत थोडी बदलल्याचे दिसत आहे. ड्रोनचा उपयोग हल्ल्यासाठी करण्यात आल्याचा प्रकार सहा दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. त्यानंतर मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेटने हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. आरके रबेई (78) असे या व्यक्तीचे नाव आहे. यानंतर पोलीस दल आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना या भागात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. मुआलसांग गावात दोन तर चुडाचांदपूरमधील लाइका मुआलसौ गावात एक बंकर नष्ट करण्यात आले.

follow us