Manipur Violence : मणिपुरात सीआरपीएफ बटालियनवर हल्ला; दोन जवान शहीद
Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे. शुक्रवारी रात्री उशीरा कुकी जमावाकडून केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही जवान बिष्णुपूर जिल्ह्याती नारानसेना येथे तैनात होते. हे दोन्ही जवान सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनमधील होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या राज्यातून ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. आता तर पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत या हल्लेखोरांनी मजल गाठली आहे.
Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुकी कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. याआधी या हल्लेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्व भागात एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात कुकी समुदायातील दोन लोकांचा मृत्यू झाला. यानंतर थौबल जिल्ह्यातील हेइरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवसांच्या क्रॉस फायरिंगनंतर इंफाळच्या पूर्व भागातील मोइरंगपुरेल जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला. यामध्ये कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या भागातील हत्यारबंद लोकांचा सहभाग होता.
याआधी फेब्रुवारी महिन्यात संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं होतं. या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या घटनेवरून स्पष्ट होत आहे की आता राज्यात पोलीस देखील सुरक्षित नाहीत. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांवरील हल्ल्यांतही आता वाढ झाली आहे.
मणिपुरात मागील वर्षी 3 मे रोजी मैतेई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी एकता मार्चनंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 180 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येत मैतेई समाजाची लोकसंख्या 53 टक्के आहे. हा समाज इंफाळ खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. तर आदिवासी यामध्ये नागा आणि कुकींचा समावेश आहे. या समाजाची लोकसंख्या 40 टक्के असून हा समाज मुख्यत्वे राज्यातील पहाडी जिल्ह्यांत वास्तव्य करतो.
Manipur Violence : मणिपुरात पोलिसही असुरक्षित; 400 लोकांच्या जमावाने ‘एसपी’ ऑफिस पेटवलं
काय आहे मैतेई समाजाची मागणी?
राज्यातील मैतेई समाजाची लोकसंख्या 53 टक्क्यांहून अधिक आहे. हा एक गैर-आदिवासी समुदाय आहे आणि बहुतेक हिंदू आहेत. त्याच वेळी कुकी आणि नागा यांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. राज्यात एवढी मोठी लोकसंख्या असूनही मैतेई समुदाय केवळ खोऱ्यातच स्थायिक होऊ शकतो.