Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू
Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) उफाळून आले आहे. राज्यातील लेंगोल पहाडी भागात चौघा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील हिंसाचार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाच अशा घटना घडत असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. जबरदस्तीने वसुली करण्यासाठी काही जण या भागात आले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांना हाकलून लावले. जाताना मात्र या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात चौघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जण ठार
या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून पाच जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांत कर्फ्यू लावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर परिस्थिती चिघळली होती. स्थानिक नागरिकांनी वाहनांना आगी लावल्या होत्या. यामुळे येथील परिस्थिती तणावाची बनली होती. दरम्यान, राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारसमोरील आव्हाने वाढली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार झाला होता
3 मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (ATSUM) ने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला होता. चुरचंदपूरच्या तोरबांग भागात ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. रॅलीदरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की तेथे लष्कर आणि निमलष्करी दलाला तैनात करण्यात आले.
काय आहे मैतेई समाजाची मागणी?
राज्यातील मैतेई समाजाची लोकसंख्या 53 टक्क्यांहून अधिक आहे. हा एक गैर-आदिवासी समुदाय आहे आणि बहुतेक हिंदू आहेत. त्याच वेळी कुकी आणि नागा यांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. राज्यात एवढी मोठी लोकसंख्या असूनही मैतेई समुदाय केवळ खोऱ्यातच स्थायिक होऊ शकतो.