Download App

महाराष्ट्रात दोस्ती, दिल्लीत कुस्ती, राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; उमेदवारांची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

NCP Contest in Delhi Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने (Maharashtra Elections 2024) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले होते. या तिन्ही पक्षांच्या महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elecions 2025) मात्र असे घडताना दिसत नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील 11 मतदारसंघांत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पक्षाच्या 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तसेच पहिली उमेदवार यादी देखील जारी केली.

एनसीपीने बुराडी मतदारसंघात रतन त्यागी, बदलीमधून मुलायम सिंह, मंगोल पुरीमधून खेम चांद, चांदनी मतदारसंघात खालिद उर रहमान, छतरपूरमधून नरेंद्र तनवीर, संगम विहारमधून कुमर अहमद, ओखला मतदारसंघातून इमरान सैफी, लक्ष्मीनगरमधून नामहा, सिमापुरी मतदारसंघातून राजेश लोहिया, गोकलपुरीमधून जगदीश भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिल्लीतही लाडकी बहीण योजना, दरमहा खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे, केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक

25 मतदारसंघांत उमेदवार देणार

ब्रिजमोहन श्रीवास्तव एका हिंदी वृत्तवाहिनिशी बोलताना सांगितले की दिल्लीतील एकूण 25 मतदारसंघांत उमेदवार देण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाने उमेदवार दिले होते. या निवडणुकीत उमेदवार विजयी झाले नसले तरी निवडणूक निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती ती म्हणजे दिल्लीतील जनतेने पक्षाला पसंती दिली होती. याच कारणामुळे यावेळच्या निवडणुकीतही उमेदवार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

भाजपबरोबर आघाडी नाही

दिल्ली निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी संदर्भात विचारले असता श्रीवास्तव म्हणाले, आम्ही दिल्लीत भाजपबरोबर आघाडी करून निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. याबाबत आम्ही भाजपला प्रस्ताव सुद्धा दिला होता मात्र भाजपकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही दिलेले उमेदवार सक्षम आहेत आणि त्यांच्या भागात लोकप्रिय आहेत. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस चांगले प्रदर्शन करील असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ

दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीने सर्व मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने देखील एक यादी जाहीर केली आहे. पण भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.

follow us