Download App

New Chief Minister : एमपी, छत्तीसगड राजस्थानचा CM कोण? BJP करणार नवा चमत्कार

New Chief Minister : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) आणि राजस्थानात वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनाच मुख्यमंत्री करायचं की आणखी कुणाला संधी द्यायची याचा निर्णय अजून झालेला नाही. राजकारणात चमत्कार करण्यात भाजप माहीर आहे. तसाच चमत्कार भाजप पुन्हा करणार का?, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. न्यूज एजन्सी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की भाजप तीन राज्यांत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता जास्त आहे.

मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटलं जात आहे की भाजप तीन राज्यात लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री निश्चित करू शकतो. मंगळवारी पीएम नरेंद्र मोदी यांच्या घरी साडेचार तास बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित होते. या बैठकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यातील मुख्यमंत्री पदावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवराज आणि वसुंधरा राजे आणि रमण सिंह याआधीही मुख्यमंत्री होते. आता राज्यात सीएम निश्चित करण्यासाठी अमित शाह आणि नड्डा तेथील इंजार्जकडूनही फीडबॅक घेत आहेत. आता असंही सांगितलं जात आहे की भाजप या तीन राज्यांत लवकरच पर्यवेक्षकांची नियुक्ती करू शकतो. हे पर्यवेक्षक सर्व आमदारांच्या बैठका घेतील. आमदारांची मतं जाणून घेण्यात येतील. त्यानंतर हा अहवाल हायकमांडला पाठविण्यात येईल.

MP Election 2023 : शिवराज सरकारचा गड आला पण सिंह गेला, वादग्रस्त गृहमंत्र्यांना मतदारांचा झटका

तीन राज्यांसाठी कुणाची नावं चर्चेत 

मध्य प्रदेशात शिवराज यांच्याव्यतिरिक्त प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावांची चर्चा आहे. तर दुसरीकडे राजस्थानात वसुंधराराजे यांच्या व्यतिरिक्त ओम बिर्ला, गजेंद्र शेखावत, अर्जन राम मेघवाल, सीपी जोशी, दीया कुमारी आणि बाबा बालकनाथ यांच्या नावांची चर्चा आहे. छत्तीसगडसाठी रमण सिंह यांच्याव्यतिरिक्त अरुणकुमार साव, धर्मलाल कौशिक, माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, या तीन राज्यांत मुख्यमंत्री कोण असेल यावर अजूनही काही ठरलेलं दिसत नाही. कारण भाजप नेतृत्व नेहमीच चमत्कारिक निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. याआधी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करून भाजपने याचा प्रत्यय दिला आहेच. त्यामुळे आता या तीन राज्यांची कमान कुणाच्या हाती दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

follow us