MP Election 2023 : शिवराज सरकारचा गड आला पण सिंह गेला, वादग्रस्त गृहमंत्र्यांना मतदारांचा झटका
MP Election 2023 : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देशभरात ओळखले जाणारे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांना विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाने (BJP) या निवडणुकीत ऐतिहासिक आणि देदीप्यमान कामगिरी केली. मात्र नरोत्तम मिश्रा यांना दतिया विधानसभा मतदारसंघातील जनतेने नाकारले. नरोत्तम मिश्रा यांचा काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती यांनी 7156 मतांनी पराभव केला.
नरोत्तम मिश्रा यांना 80,492 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजेंद्र भारती यांना 87,648 मते मिळाली. भारती 7,156 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. याशिवाय या जागेवर उभे असलेल्या 14 उमेदवारांची अनामत रक्कम जमा झाली आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास नरोत्तम मिश्रा यांचा दारुण पराभव झाला.
मागच्या वेळीही काटे की टक्कर
भाजपने मिश्रा यांना सलग चौथ्यांदा दतिया मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. काँग्रेसने याआधी भाजपविरोधात बंडखोरी केलेल्या अवधेश नायक यांना या जागेसाठी उमेदवारी दिली होती, मात्र नंतर या जागेसाठी राजेंद्र भारती यांना तिकीट दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही मिश्रा आणि भारती यांच्यात निकराची लढत झाली होती. नरोत्तम मिश्रा यांना 72209 तर राजेंद्र गौतम यांना 69553 मते मिळाली. नरोत्तम मिश्रा अवघ्या 2656 मतांनी विजयी झाले होते. यावेळीही दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित होती आणि तसेच झाले.
लग्न न करण्याची शपथ घेतली; पण पहिल्याच भेटीत शिवराज सिंह प्रेमात पडले
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते
विधानसभा निवडणुकीपूर्वी नरोत्तम मिश्रा हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. पण पराभवामुळे राज्यातील सर्वात मोठे राजकीय पद भूषवण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. राज्यातील 230 पैकी 164 जागा जिंकण्यात भाजपला यश आले. तर दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन 2024’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला ?
33 मंत्र्यांपैकी 12 मंत्र्यांचा पराभव
नरोत्तम हा भाजपचा पराभवाचा एकमेव मोठा चेहरा नाही. खासदार फग्गनसिंग कुलस्ते यांना निवास मतदारसंघातून तर खासदार गणेश सिंह यांना सतना मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासोबत हरदामधून कृषीमंत्री कमल पटेल, पोहरीमधून मंत्री सुरेश धाकड राठखेडा, बामोरीतून मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया, बरवानीतून प्रेमसिंग पटेल, अतेर अरविंद सिंग भदौरिया, बडनावारमधून राजवर्धन सिंग दात्तीगाव आणि पोहरीमधून सुरेश धाकड यांनाही पराभव पत्करावा लागला. यापैकी सुरेश धाकड, राजवर्धन सिंह दात्तीगाव, महेंद्रसिंग सिसोदिया हे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात.