New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवनाच्या इमारतीचे (New Parliament Building Inauguration) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसदेच्या सभागृहात सेंगोल स्थापित करण्यात आला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी आगामी 25 वर्षातील देशाच्या वाटचालीचा रोडमॅप सादर केला.
मोदी म्हणाले, पुढील 25 वर्षात देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होतील. आपल्याकडे आणखी 25 वर्षे आहेत. तेव्हा या काळात भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नवीन संकल्प घ्यावे लागणार आहेत. लक्ष्य मोठे आणि कठीण असले तरी ते आपल्याला साध्य करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिक आहे. संसद भवन जगाला भारताच्या दृढ संकल्पाचा संदेश देत आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवीन भवन आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करण्याचे माध्यम बनेल. भारताचा गौरव शेकडो वर्षांच्या गुलामीने हिसकावला. एक काळ असा होता ज्यावेळी भारतीयांना दुसऱ्या देशांची प्रगती पाहून आनंद व्हायचा. आता तो गुलामीचा विचार आपण मागे टाकत आहे.
New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स
संसदेत भविष्यात सदस्यांची संख्या वाढेल त्यावेळी बसणार कुठे असा प्रश्न होता. त्यामुळे नव्या संसद भवनाची गरज होती. नवीन इमारत तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या सभागृहात आधुनिक सुविधा भरपूर आहेत. सूर्याचा प्रकाश सभागृहात सरळ येतो त्यामुळे विजेची मोठी बचत होईल. ज्या मजुरांनी ही इमारत उभी केली त्यांना मी भेटलो. या संसद भवनाने जवळपास साठ हजार श्रमिकांना रोजगार दिला. त्यांनी या इमारतीसाठी आपला घाम गाळला. त्यांच्या श्रमांना समर्पित एक डिजिटल गॅलरी संसदेत बनवली आहे, असे त्यांनी सांगितले.
नऊ वर्षात काय केलं, मोदींनी सांगितलं
हे नऊ वर्ष भारतात नवनिर्माण आणि गरीब कल्याणाचे राहिले आहेत. नव्या इमारतीचा गर्व तर आहेच पण मला या नऊ वर्षात गरीबांचे चार कोटी घरे बनवल्याचाही आनंद आहे. मला आनंद आहे मागील नऊ वर्षात गावांना जोडण्यसााठी चार लाख किलोमीटर रस्ते बनवले. पाण्याचे थेंब वाचविण्यासाठी पन्नास हजार सरोवरे निर्माण केली. तीस हजारांपेक्षा जास्त नवे पंचायत भवन बननले त्याचाही मला आनंद आहे. यावरून हे सिद्ध होते की देश आणि देशातील नागरिकांचा विकास हीच आमची प्रेरणा राहिली आहे.
#WATCH | From panchayat bhawan to Sansad bhawan, our pledge and inspiration remains the development of our country and its people: PM Modi in the new Parliament building pic.twitter.com/eydSoVIUzl
— ANI (@ANI) May 28, 2023
भारताला विकसित राष्ट्र बनवायचे
2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. या 25 वर्षात आपल्याला भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. लक्ष्य मोठे आणि कठीण आहे. पण प्रत्येक नागरिकाला प्रयत्न करावे लागतील. नवीन संकल्प घ्यावे लागणार आहेत. विकसित भारताच्या निर्माणात संसद भवन प्रेरणा देईल. संसदेत लोकप्रतिनिधी बसतील ते लोकतंत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्र प्रथम या भावनेने पुढे जावे लागेल. व्यवहारावरुन उदाहरण समोर ठेवावे लागेल. स्वतःमध्ये निरंतर सुधारणा कराव्या लागतील. नवीन रस्ते स्वतःच तयार करावे लागतील. लोकहितालाच ध्येय बनवावे लागेल. जबाबदारीचे पालन करावे लागेल, असे मोदी म्हणाले.
आता आपली जबाबदारी आहे
श्रमिकांनी घाम गाळून ही भव्य इमारत उभी केली. आता आपली जबाबदारी लोकप्रतिनिधींनी आपल्या समर्पणाने या भवनाला अधिक भव्य बनवावे. येथे होणारा प्रत्येक निर्णय देशाची पुढील वाटचाल ठरवील. या भवनाचा कण न् कण गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. पुढील 25 वर्षात बनणारे नवीन कायदे भारताला विकसित भारत बनवतील. गरीबीतून देशाला बाहेर काढतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.