आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये (Murder) एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. श्रीकाकुलम येथील रहिवासी असलेल्या तेजश्री नावाच्या तरुणीचा विवाह होऊन अवघे दोन महिने झाले होते, परंतु हुंड्यासाठी पतीने तिचे आयुष्य हिरावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तेजश्रीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी श्रीकाकुलम येथीलच दप्पा सोमेश्वर राव याच्याशी 6 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात तिचे लग्न लावून दिले होते. सोमेश्वरने स्वतःला विशाखापट्टणम डॉकयार्डचा कर्मचारी असल्याचे खोटे सांगितले होते आणि महिला हॉस्टेलच्या माध्यमातून दरमहा 2 लाख रुपयांची कमाई असल्याचा बनाव रचला होता.
मुलीला सुरक्षित घर मिळत आहे या विचाराने पालकांनी 18 लाख रुपये रोख आणि 19 तोळे सोने असा एकूण 28 लाखांहून अधिक खर्च केला, मात्र हे सर्व एक षडयंत्र असल्याचे लग्नानंतर लगेचच स्पष्ट झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून छळ आणि फसवणुकीचा पर्दाफाश लग्न आटोपून विशाखापट्टणममधील रेसापुवनीपालेम येथील घरी पोहोचताच सोमेश्वरचे खरे रूप समोर आले. त्याने तेजश्रीला स्पष्टपणे सांगितले होते की, त्याने सौंदर्यासाठी नाही तर केवळ पैशांसाठी तिच्याशी लग्न केले आहे. विशाखापट्टणममध्ये आल्यापासूनच तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले.
विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप
आरोपी सोमेश्वर तिला आणखी हुंडा आणण्यासाठी वारंवार छळ करू लागला. पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, सोमेश्वरचे इतर तरुणींशीही अनैतिक संबंध होते, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत.हा केवळ हुंड्याचा प्रश्न नसून एका सुनियोजित फसवणुकीचा भाग असल्याचे तपासातून दिसून येत आहे, ज्यामध्ये एका निष्पाप तरुणीला बळी देण्यात आले. 7 तारखेला जेव्हा तेजश्रीची आई शारदा यांनी आपल्या मुलीला फोन केला, तेव्हा अनेकदा रिंग जाऊनही फोन उचलला गेला नाही.
अखेर सोमेश्वरने फोन उचलला आणि सांगितलं की तेजश्रीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही बातमी ऐकताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मात्र, जेव्हा तिचे आई-वडील विशाखापट्टणममध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना तेजश्रीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि गळ्यावर आवळल्याचे खोल व्रण दिसले. सोमेश्वर याने तिला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली, तसेच या हत्येला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप तेजश्रीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
