पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, काँग्रेससह आता सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात एनडीए आघाडीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया (India) आघाडीची स्थापना केली आहे. याच आघाडीचा चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना घोषित करावे अशी मागणी होत आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी थेट वाराणसीत प्रचाराला जाण्याचे नियोजन केले आहे. (Nitish Kumar will hold his first public meeting in Varanasi on December 24.)
गत दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून जात आहेत. त्याचमुळे इंडिया आघाडीच्या वतीने नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर वाराणसीतून प्रचाराची सुरुवात करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी 24 डिसेंबर रोजी नितीश कुमार वाराणसीमध्ये पहिली जाहीर सभा घेणार आहेत. वाराणसीच्या कुर्मी व्होट बँक आपल्या बाजूने वळविण्यासाठी ते वाराणसीच्या रोहनिया येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. बिहारचे कॅबिनेट मंत्री आणि जेडीयूचे संघटन मंत्री यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, या रणनितीमुळे नितीश कुमार उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. सध्या नितीशकुमार उत्तर प्रदेशातील फुलपूर, बनारस आणि आंबेडकर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय, नितीश कुमारही प्रतापगडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नितीश कुमार यांच्या वाराणसीतील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबरला वाराणसीत येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात वाराणसीतूनच करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात 43व्यांदा वाराणसीला भेट देत आहेत. यावेळी ते वाराणसीमध्ये डझनभराहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील, असे सांगितले जात आहे.