Old Parliament House : नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचे कामकाज नवीन संसद भवनातून सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच जुन्या संसद भवनाला नवीन नवा मिळाले आहे. जुने संसद भवन आता ‘संविधान सदन’ म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीत राज्यसभा सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या नावाचा प्रस्ताव सुचविला आहे. (Old Parliament House will now be known as ‘Constitution House’)
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आपण नव्या संसदेत जाणार आहोत. पण या जुन्या वास्तूची परंपरा आणि प्रतिष्ठा कायम राहायला हवी. त्यासाठी केवळ जुनी संसद असं म्हणून ओळखलं जायला नको. त्यामुळे माझी विनंती आहे आणि तुम्ही सहमत असाल तर ही वास्तू आता ती ‘संविधान सभा’ म्हणून ओळखली जावी. यावर सर्वांनी समोरील बाकं वाजवून पंतप्रधान मोदी यांच्या या विनंतीला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, संसदेच्या माध्यमातून कलम 370 हटविले गेले. फुटीरतावाद आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. या कामात माननीय खासदार आणि संसद यांचा मोठा वाटा आहे. या सभागृहात तयार केलेली राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आली. आज जम्मू-काश्मीरने शांतता आणि विकासाच्या मार्गावर सुरुवात केली आहे.
नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आणि नव्या निर्धाराने तिथले लोक पुढे जाण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. मुस्लिम भगिनींनाही याच संसदेतून न्याय मिळाला. संसदेने ट्रान्सजेंडर समूह आणि अपंग लोकांसाठी कायदे केले. ट्रान्सजेंडर्सना आपण सौहार्द आणि आदराने नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधा देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की 1952 नंतर जगभरातील सुमारे 41 राष्ट्रप्रमुखांनी या सेंट्रल हॉलमधून आपल्या सर्व सन्माननीय खासदारांना संबोधित केले आहे. सर्व अध्यक्षांनी 86 वेळा येथे भाषणे दिली आहेत. या मध्यवर्ती सभागृहात तिरंगा आणि राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. ही संसद आपल्याला संकल्प देते आणि प्रेरणाही देते.
भारतातील तरुण तंत्रज्ञानाच्या जगात ज्या प्रकारे प्रगती करत आहेत, ते संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अमृतकालच्या 25 वर्षात भारताला आता एका मोठ्या कॅनव्हासवर काम करावे लागणार आहे. आपण प्रथम स्वावलंबी भारत बनवण्याचे ध्येय पूर्ण केले पाहिजे. आता आपल्याला उत्पादन क्षेत्रात जगातील सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी काम करायचे आहे. आता प्रत्येक क्षेत्रात जागतिक मानकांना मागे टाकण्याच्या इराद्याने आम्हाला पुढे जायचे आहे.