ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..

भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.

Operation Sindoor

Operation Sindoor

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाला खरी सुरुवात 7 मेपासून झाली होती. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. या मोहिमेत थेट पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. भारताच्या या कारवाईत 100 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. तीन अतिशय कुख्यात अतिरेक्यांनाही संपवण्यात आलं.

चार दिवस चाललेल्या या तणावानंतर शनिवारी सायंकाळी अचानक युद्धविराम लागू करण्यात आला. यानंतर काहीच वेळात पाकिस्तानने युद्धविराम तोडून पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर काही वेळाने पाकिस्तानच्या या खोड्या थांबल्या होत्या. त्यानंतर आज सायंकाळी भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली. याबाबत थोडक्यात जाणून घेऊ या..

Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ

1. या मोहिमेत भारताने पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्ड्यांना उद्धवस्त केलं. यात लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बूल मुजाहीदीन यांसारख्या संघटनांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले.

2. भारताने थेट पाकिस्तानात हल्ले केले होते. यातून जगालाही लक्षात आलं की भारत पाकिस्तानात कुठेही हल्ले करण्यास सक्षम आहे. दहशतवादी आणि त्याचे समर्थक वेगळे असतात ही धोरणा तोडण्यात भारताने यश मिळवलं.

3. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने एक लाल रेष ओढली आहे. याकडे आता पाकिस्तान आणखी दुर्लक्ष करू शकणार नाही. भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करू शकत नाही. जर पुन्हा आगळीक झाली तर त्याचे परिणाम भयंकर असतील.

4. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहिल्यांदाच दहशतवादी आणि त्यांचे आका या दोघांवरही कारवाई झाली आहे.

5. पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम किती कमजोर आहे याची प्रचिती जगाला आली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या सिस्टिमला बायपास केले. फक्त 25 मिनिटांत 9 अड्डे उद्धवस्त करुन टाकले. स्कॅल्प मिसाइलच्या मदतीने राफेल जेट विमानांनी थेट हल्ले केले.

6. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. एस 400 सुदर्शन चक्र आणि आकाशतीर एअर डिफेन्स सिस्टिमने शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाइल्स हवेतच नष्ट केल्या.

7. या मोहिमेत भारताने फक्त दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. पाकिस्तानचे सैन्य किवा नागरिक वस्त्यांवर कोणतेही हल्ले केले नाहीत.

Video : …तर काय उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहीत आहे; भारतीय नौदलाने ‘हवाच’ काढली

8. या मोहिमेत भारताने काही अतिशय धोकादायक दहशतवाद्यांना मारले. यात मोस्ट वाँटेड यादीतील अतिरेकीही होते. एकाच रात्रीत दहशतवादी मॉड्यूलच्या नेतृत्वाचा नायनाट करण्यात आला.

9. भारताने पाकिस्तानच्या अनेक एअर कॅम्प्सना टार्गेट केले. तीन तासात लाहोर, रावळपिंडी, सियालकोट, शोरकोट, जकोबाबाद, रहीम यार खान एअरबेसना टार्गेट केले. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.

10. या मोहिमेत भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी अतिशय समन्वयाने काम केलं. त्यामुळे या मोहिमेत भारताचं यश शंभर टक्के होतं.

11. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने जगाला दाखवून दिलं की भारत आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. दहशतीला कधीही कुठेही दंड करण्याची क्षमता भारतात आहे.

12. या कारवाईत भारताला जगातील अनेक देशांचं समर्थन मिळालं. जगातील अनेक नेते दहशतवादाविरोधातील भारताच्या संघर्षाला पाठिंबा देत आहेत.

Exit mobile version