मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापासून सामान्यातील सामान्य माणूस या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशात संबंधित पीडित महिलांपैकी एका महिलेच्या पतीने त्याची आपबिती माध्यमांसमोर मांडली आहे. हा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय धाडसाने जमावाने कशा पद्धतीने अत्याचार केले याचा घटनाक्रमच सांगितलं आहे. तसंच मी माझ्या देशाचे, मातृभूमीचे रक्षण केले पण माझ्या पत्नीचे आणि कुटुंबाचे रक्षण करु शकलो नाही अशी खंतही बोलून दाखविली. (One of the victims in Manipur, whose husband is an ex-army man, has shared his ordeal with the media.)
संबंधित पतीने एका मुलाखतीत सांगितले की, 4 मे रोजी संतप्त जमावाने आमच्या गावातील अनेक घर जाळली. जेव्हा जमाव गाव पेटवत होते, तेव्हा आम्ही जंगलात लपलो. माणसांप्रमाणेच ते प्राण्यांनाही मारत सुटले होते. त्यामुळे प्राणीही जीव वाचवून जंगलाकडे धावले. लोकं आणि प्राणी जिकडे लपले होते तिकडेही जाळपोळ करणारे लोकं पोहचले. त्याचवेळी एक पिता-पुत्राची हत्या करण्यात आली. त्यानंतर जमावाने हत्या केलेल्या त्या व्यक्तीच्या मुलीला आणि माझ्या पत्नीला जबरदस्तीने ओढत नेलं आणि त्यांचे कपडे काढले.
संबंधित निवृत्त जवानाने सांगितलं की, हिंसाचाराच्या वेळी तिथं एक पोलिस कर्मचारीही उपस्थित होता, पण तिथून तो पोलिस ठाण्यात पळून गेला. पोलीस पळून जाताच जमावाला मोकळे मैदान मिळाले. जमाव अधिकच आक्रमक झाला. महिलांनी भीतीपोटी कपडे काढले नाहीतर जमावाने त्या महिलांना मारलं असतं, त्यांच्याकडे शस्त्र होती. पण आपल्यावर असा हल्ला होईल असे कधीच वाटलं नव्ंते. ज्या पद्धतीने हा जमाव आमच्याशी वागला त्याप्रमाणे प्राणी सुद्धा वागत नाहीत.
मी सैन्यात सुभेदार होता, मी कारगिल युद्धात लढलो आहे. मी भारतीय लष्कराच्या शांतीसेनेचा सदस्य म्हणून अनेक दिवस श्रीलंकेत होतो. माझ्या देशासाठी एवढी सेवा केल्यानंतर आता सेवानिवृत्तीनंतर मात्र मी माझी पत्नी, माझे घर आणि माझ्या गावाचे रक्षण करू शकलो नाही. अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, त्यांना सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी, अशी मागणीही या जवानाने केली.