युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. (War) भारतालाही याची मोठी झळ सहन करावी लागत आहे. अशातच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली. या चर्चेबाबत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या वीज आणि ऊर्जा केंद्रांवरील हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले होते की, इराणसोबत चांगल्या चर्चा सुरू आहेत आणि युद्ध संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इराणने या चर्चेला नकार दिला असून ट्रम्प खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा जगातील सुमारे 20% तेल आणि वायू व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याच तणावाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कारण भारतासह इतर देशांना होणारा कच्च्या तेलाचा आणि वायुचा पुरवठा याच भागातून होतो. त्यामुळे हा मार्ग खुळा ठेवण्याची भारताची भूमिका असल्याचे आता समोर आले आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत मध्य पूर्वेतील संकटावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, युद्धाच्या परिस्थितीत भारत जहाजे सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचावीत यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी भारत संवादाचा मार्ग अवलंबत आहे. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले असून भारत विविध देशांकडून तेल आणि वायू खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत तणाव कमी व्हावा आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली रहावी यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व देशांनी परस्पर संवादातून शांततेने प्रश्न सोडवावेत, अशी भारताची भूमिका आहे.
तसंच भारत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केल. अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले सुरू केले. या युद्धाला 25 दिवस झाले आहेत. या युद्धात 2600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी इराणमध्ये सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये 1000 हून अधिक लोक ठार झाले आहेत. इस्रायलमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 13 अमेरिकन सैनिकही मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आखाती देशातील काही नागरिकांचाही यात मृत्यू झाला आहे.
