इराणविरोधात अमेरिकेची नवी रणनीती; हवाई हल्ल्यांनी उद्दिष्ट साध्य न झाल्याने पर्यायी मार्गांचा शोध

हवाई मोहिमेचा अपेक्षित परिणाम न झाल्यास जमिनीवरील लष्करी कारवाई हा पुढील पर्याय मानला जातो.

News Photo   2026 08 04T153940.938

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष निर्णायक (US) टप्प्यावर पोहोचला असून, केवळ हवाई हल्ल्यांच्या जोरावर इराणला नमविणे शक्य नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या तीव्र बॉम्बहल्ल्यांनंतरही होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव पूर्णपणे कमी झालेला नाही. तसंच इराणच्या अणुकार्यक्रमावरही ठोस परिणाम झालेला नसल्याने अमेरिकेसमोर मोठे लष्करी आणि राजनैतिक आव्हान उभे राहिले आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांड (सेंटकॉम) मधील एका गुप्तचर अधिकाऱ्याने लष्करी विश्लेषकांच्या मोठ्या गटाला संदेश पाठवून इराणवर दबाव आणण्यासाठी नवे, कल्पक आणि अपारंपरिक पर्याय सुचविण्याचे आवाहन केले आहे. संरक्षण विभागाकडून अशा प्रकारे व्यापक स्तरावर रणनीती मागविणे अत्यंत दुर्मीळ मानले जात असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे इराणवर दबाव आणण्यासाठी उपलब्ध पर्याय मर्यादित होत असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Donald Trump : अमेरिकेचा इराणवर नियोजित हल्ला रद्द; सौदी अरेबिया ठरलं कारण ?

इराणने फोर्डो आणि नतांझ यांसारखी महत्त्वाची अणुकेंद्रे पर्वतांच्या आत खोलवर उभारल्यामुळे ती नष्ट करणे अमेरिकेसाठी कठीण ठरत आहे. अत्याधुनिक भेदक बॉम्बचा वापर करूनही या ठिकाणांचे संपूर्ण नुकसान करण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे, सातत्याने होणाऱ्या हवाई हल्ल्यांनंतरही इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या भूमिकेत कोणताही मोठा बदल झालेला नाही.

हवाई मोहिमेचा अपेक्षित परिणाम न झाल्यास जमिनीवरील लष्करी कारवाई हा पुढील पर्याय मानला जातो. मात्र इराणचा विस्तीर्ण आणि गुंतागुंतीचा भूभाग लक्षात घेता अशा कारवाईमुळे दीर्घकाळ चालणारे युद्ध ओढवू शकते. सध्याच्या संघर्षात आतापर्यंत १८ अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक सैनिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर राजकीय पेचही निर्माण झाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अमेरिकी सैनिकांना परदेशातील दीर्घकालीन युद्धांत न पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे इराणवर दबाव कायम ठेवणे, त्याला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक सुरक्षित राखणे या उद्दिष्टांसह मोठ्या भूदल मोहिमेपासून दूर राहण्याचे आव्हान त्यांच्या प्रशासनासमोर आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिका आता अपारंपरिक उपाययोजनांवर भर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले, देशांतर्गत असंतोषाला गुप्त पातळीवर चालना देऊन सरकारवर दबाव वाढविणे आणि इराणच्या आर्थिक स्रोतांवर अधिक कठोर निर्बंध लादून निधीचे सर्व मार्ग रोखण्याच्या पर्यायांचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे वृत्त आहे.

follow us