Sikkim Elections 2024 : निवडणूक म्हटलं की लाखोंचा चुराडा, तगडा प्रचार, गावोगावी सभा अन् मेळावे, आलिशान वाहनांची रेलचेल, नेते मंडळींचा राबता असंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. आताच्या हायटेक जमान्यात निवडणुकीत सोशल मीडियाचा वापरही प्रचंड वाढला आहे. सभा, मेळावे, रॅली ऑनलाइन होत आहेत. पण, या सगळ्या इलेक्शन गदारोळात असाही एक उमेदवार आहे ज्याच्याकडे ना जमीन आहे ना घर.. कुटुंबही दुसऱ्याच्या शेतात राहते. तेथेच शेती करते आणि ठराविक हिस्सा शेतमालकाला देते. याच कुटुंबातील एक व्यक्ती निवडणुकीत उभा असून स्कूटर आणि हँड माईक फक्त या दोन गोष्टींच्या मदतीने प्रचार करत आहे. तुम्हाला हे सगळं ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. प्रवीण शर्मा नामक उमेदवार सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या (Sikkim Elections 2024) रिंगणात अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.
सिक्कीममध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीत प्रवीण शर्मा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सिक्कीमचं राजकारण पैसा, ताकद आणि दारू या त्रिसूत्रीवर चालतं असं म्हटलं जातं. ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत त्याचं राजकारण नाही असाच येथे शिरस्ता आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत तर दुसरीकडे असेही काही उमेदवार आहेत जे कमीत कमी खर्चात प्रचार करताना दिसत आहेत. आता यामध्ये ते किती यश मिळवतील याचं उत्तर निकालानंतरच मिळेल.
सिक्कीममधील गेजिंग जिल्ह्यातील 02 यांगथांग विधानसभा मतदारसंघात चोंगजोंग गावातील रहिवासी प्रविण शर्मा यंदा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. प्रवीण शर्मा असे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे ना जमीन आहे ना घर. निवडणुकीत त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते सगळे राजकारणातील माहीर खेळाडू आहेत. शर्मा यांचा सामना राज्य सरकारमधील मंत्री तसेच राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध आहे.
प्रवीण शर्मा यांच्या संपत्तीवर नजर टाकली तर त्यांच्याकडे फक्त चार गायी सोडल्या तर काहीच नाही. त्यांची आई शेतीकाम करते तर वडील पारंपरिक पद्धतीने आजारांवर उपचार करतात. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यात म्हटले आहे की शर्मा यांच्या बँक खात्यात फक्त 16 हजार रुपये आहेत. हातात दहा हजार रुपये रोकड होती त्यातील काही पैसे आता खर्च झाले आहेत.
प्रवीण शर्मा यांचे कुटुंब दुसऱ्यांच्या जमिनीवर राहतात. ज्यांच्या जमिनीवर राहतात त्याच जमिनीवर शेती करतात. या मोबदल्यात त्यांना दरवर्षी जमीन मालकाला ठराविक धान्य द्यावे लागते. शर्मा यांनी सांगितले की गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून डेअरी फार्मिंगसाठी 3 लाख 22 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने आता शर्मा स्वतः स्कूटर आणि हॅण्ड माईक घेऊन प्रचार करत आहेत. त्यांना समर्थनही मिळत असून काही युवक त्यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत.