Bhiwandi Loksabha 2024 : महाविकास आघाडीत बंडाचे वारे; भिवंडीत राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस नेत्यांनी ठोकला शड्डू
Bhiwandi Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीसह(MVA) महायुतीमध्येही अद्याप नाराजीनाट्य सुरुच आहे. त्यामुळे काही जागांवर अद्यापही उमेदवारी निश्चित करता आलेली नाही. त्यातच सांगली लोकसभेच्या जागेनंतर आता भिवंडी लोकसभेच्या (Bhiwandi Loksabha)जागेचा मुद्दाही कळीचा बनला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar Group)भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस (Congress)कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे. महाविकास आघाडीमध्ये या जागेचा निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीने जागा जाहीर केली, असा आरोप कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे (Suresh Taware)यांनी केला आहे.
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांनी का जाहीर केली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी
कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुरेश म्हात्रे यांना कसलीही मदत करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. आता वरिष्ठ नेत्यांकडून जरी आदेश आला तर आम्ही सर्वजण राजीनामा देऊ अशी भूमिका कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचे यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले.
मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार, संध्याकाळपर्यंत ठरणार पक्षप्रवेशाचा मुहूर्त
तसं पाहिलं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर आणि मुरबाड हे विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी, आदिवासी मतदार आहेत.
यापूर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये कॉंग्रेसच्या खासदाराने बाजी मारली होती. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली होती. त्यामंळे काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट देखील या जागेसाठी आग्रही होता. ही जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर राजीनामा देऊ, असा इशारा काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे या जागेवरुन महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखीच वाढली आहे.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने या जागी सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांना उमेदवारी जाहीर केली. पण त्यामुळे आता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडाची तयारी केली आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाळ्यामामा यांना मदत करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये कॉंग्रेसकडून असहकाराची भूमिका घेण्यात आली आहे.
महाविकास आगाडीत या जागेचा निर्णय झाला नसतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवार जाहीर केल्याचा आरोप स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आता मविआमध्ये देखील बंडाचे वारे वाहू लागले आहेत. एकप्रकारे कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.