Priyanka Gandhi slams govt after crackdown on CJP protesters : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा संसद परिसराच्या बाहेर पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक संसदेकडे निघाले होते. मात्र, संसद परिसराच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला.
कॉक्रोच जनता पार्टी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा’; कंगना रणौत यांची आंदोलनावर टीका!
कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक संसद परिसराच्या दिशेने रवाना झाले होते. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनीही नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. त्यामुळे रस्त्यावर सुरू असलेले आंदोलन आणि संसदेत विरोधकांकडून उपस्थित केला जाणारा मुद्दा यामुळे सरकारवर राजकीय दबाव वाढला आहे.
‘चर्चेला तयार नसाल तर मार्ग कसा निघणार?’
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या माऱ्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
“जर तुम्ही चर्चेला तयार नसाल, तर यावर मार्ग कसा निघणार? तुम्ही संसदेत चर्चाच करायला तयार नाहीत आणि दुसरीकडे मुलांना मारहाण करता,” असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. आंदोलन करणारे तरुण देशाची मुले आहेत. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा मारा केला जात असल्याचे सांगत प्रियंका गांधी यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न’; NEET मुद्द्यावर खर्गेंनी संसदेत सरकारला धारेवर धरले
संसदेच्या बाहेर अन् संसदेतही सत्ताधाऱ्यांची कोंडी
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टीकडून रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच, विरोधी पक्षांनी संसदेतही या प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. एका बाजूला आंदोलनकर्त्यांना संसद परिसरात प्रवेश रोखण्यात आला आहे, तर दुसरीकडे विरोधक संसदेत सरकारकडून उत्तर मागत आहेत. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यावरून सुरू असलेले आंदोलन यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलकांवरील कारवाईनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा होण्याची मागणी जोर धरत आहे. आता सरकार या आरोपांना आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
