कॉकरोच जनता पार्टीत अंतर्गत बंड? दिपके यांच्या घरासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन

मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 06T152851.424

Internal rebellion in Cockroach Janata Party : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीमध्ये आता अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवरून आज नवा वाद निर्माण झाला. गुजरातमधील अहमदाबाद येथील मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आंदोलनाच्या काळात पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले, तसेच पक्षाच्या भूमिकेसाठी सातत्याने काम केले. मात्र, आंदोलनानंतर पक्षाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी आरोप केला की, बैठकीसाठी केवळ पक्षप्रमुखांचे निकटवर्तीय, कुटुंबीय आणि मित्रपरिवारातील व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले. आंदोलनात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असून, पक्षामध्ये पारदर्शकता आणि लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवली जात नसल्याचा दावा त्यांनी केला.

धनुष्यबाण कोणाचा? आज होणार फैसला LIVE

दरम्यान, दिपके यांच्या घरासमोर सुरू झालेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडींमुळे कोकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत संघटनात्मक कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जंतर-मंतर आंदोलनानंतर पक्षाची लोकप्रियता वाढत असताना कार्यकर्त्यांमधील असंतोष समोर येणे ही पक्ष नेतृत्वासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. मात्र, या सर्व आरोपांवर अभिजीत दिपके किंवा कोकरोच जनता पार्टीच्या अधिकृत प्रतिनिधींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यामुळे आंदोलनकर्त्यांचे आरोप आणि पक्षाची भूमिका याबाबत स्पष्टता आलेली नाही. दोन्ही बाजूंचे म्हणणे समोर आल्यानंतरच या वादाचे नेमके स्वरूप आणि त्यामागील कारणे स्पष्ट होऊ शकतील. सध्या तरी या आंदोलनामुळे कोकरोच जनता पार्टीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराजीची दखल घेते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us