Indore Chhatron Ki Goonj : इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात (Congress) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, रोजगार, पेपरफुटी आणि सरकारी संस्थांच्या कामकाजावरून सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती हीच लोकशाहीसाठी महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांनी, “सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत,” अशी टीका केली.
विद्यार्थी कोणतीही गोष्ट केवळ सांगितली म्हणून स्वीकारत नाही, तर त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असं राहुल गांधी म्हणाले. न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि अन्य संस्थांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तरुणांनी संबंधित संस्था आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं का पार पाडत नाहीत, असा सवाल करण्याची सवय कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं.
शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थिती, वारंवार होणारी पेपरफुटी आणि तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर आणि नम्रता असतानाच समोरच्याचं म्हणणं ऐकून त्यावर प्रश्न विचारण्याची वृत्ती असते, असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या सन्मानाचाही मुद्दा त्यांनी मांडला.
दरम्यान, कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपल्या अडचणी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, जमिनीचे पट्टे, रिक्त सरकारी पदं आणि सरकारी वसतिगृहांची स्थिती याकडे एका विद्यार्थ्यानं लक्ष वेधलं. या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या तरुणांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही विद्यार्थ्यानं केला.
