Rajasthan Election : काँग्रेसशासित राजस्थान राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे या वाळवंटी राज्यातील राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. विरोधी भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता एक सर्व्हे आला आहे. या सर्व्हेतून काँग्रेसची धाकधूक मात्र नक्कीच वाढणार आहे. राजस्थानात कोणाचे सरकार बनेल याचा अंदाज व्यक्त करणारा हा सर्व्हे आहे. एबीपी-सीनवोटरने हा सर्व्हे केला आहे. यामध्ये लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. नेता म्हणून लोक कोणाला पसंत करतात, जनतेचा मूड नेमका कसा आहे याबद्दलही मते जाणून घेण्यात आली.
Tamil Nadu : भाजपच्या ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला सुरुवात; मंत्री शाह यांनी दाखवला हिरवा झेंडा
या सर्व्हेनुसार, पाच वर्षांनंतर राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार येण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 109 ते 119 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 200 जागा आहेत. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. काँग्रेसच्या हातातून मोठे राज्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जाण्याची शक्यता या सर्व्हेतून दिसत आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेसला 78 ते 88 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष आणि अन्य पक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
वोट शेअरमध्येही भाजपला फायदा मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, भाजपला 46 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 41 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. मागील 2018 च्या निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने 100 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत एत टक्क्यांपेक्षाही कमी फरक होता.
एबीपी सीवोटरच्या सर्व्हेनुसार, 39 टक्के जनता गेहलोत सरकारच्या कामकाजावर खुश आहे. तर 36 टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. 24 टक्के लोकांनी मात्र सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
41 टक्के लोक गेहलोत यांच्या कामकाजावर खुश असल्याचे दिसत आहे. तर 21 टक्के लोक नाराज आहेत. तसेच 35 टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. पीएम मोदींबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील 55 टक्के लोक मोदींच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर 17 टक्के लोक मात्र त्यांच्या कामकाजावर नाराज आहेत. या सर्व्हेनुसार, माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्या कामकाजावर 26 टक्के लोक समाधानी आहेत तर 39 टक्के लोक नाराज आहेत.