मुंबई : धनत्रयोदशीदिवशी (Dhantrayodashi) देशात सराफ बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला. भारतीय नागरिकांना मुहूर्तावर सोने खरेदीचा नवा उच्चांक नोंदविला. काल एका दिवसात तब्बल 42 टन सोन्याची खरेदी झाल्याची माहिती आहे. या व्यवहारांची किंमत 27 हजार कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला 39 टन सोन्याची खरेदी झाली होती. याशिवाय चांदीच्या विक्रीने मागील बारा वर्षांच्या विक्रीचा विक्रम मोडला. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सराफा बाजारात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. (Record breaking 42 tonnes of gold worth 27 thousand crores was sold on Dhantrayodashi)
याबाबत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, धनत्रयोदशीला ग्राहकांनी 42 टन सोन्याची खरेदी केली. तर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) नुसार, देशभरातील सराफा बाजारात सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीचा व्यवहार झाला. यात 27,000 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर उत्पादनांची विक्री झाली. तर चांदीचा व्यापारही सुमारे 3,000 कोटी रुपयांचा होता.
जागतिक सुवर्ण परिषदेचे (WGC) भारताचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, सोन्याच्या किमती गेल्या धनत्रयोदशीच्या तुलनेत जास्त आहेत. पण त्यानंतरही ग्राहकांमध्ये खरेदीबाबत सकारात्मकता दिसून आली. यावेळी सोन्याचे बार आणि नाण्यांना मोठी मागणी होती. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,100 रुपये होती, तर 999 शुद्धता असलेल्या 10 ग्रॅम चांदीची किंमत 74,000 रुपये होती.
धनत्रयोदशीच्या दिवशी गुजरातमध्ये सोन्याची विक्री सुमारे 700 किलो किमतीची 439 कोटी रुपये होती. यात एकट्या अहमदाबादमध्ये 300 किलोची विक्री झाली. सोन्याचा नाणी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांची मागणी वाढल्याने ज्वेलर्सनी विक्रीला चालना देण्यासाठी लक्षणीय सवलती देऊ केल्या.
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले की, यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण उद्योग स्तरावर 55,000 ते 57,000 वाहने वितरित करण्यात आली आहेत. मागील धनत्रयोदशीच्या तुलनेत हा आकडा 21 टक्के अधिक आहे. गेल्या वेळी सुमारे 45,000 वाहने वितरित करण्यात आली होती.