Download App

अयोध्या निकालामध्ये बहुमताच्या बाजूने कौल देणारे निवृत्त न्यायमूर्ती नझीर आंध्रप्रदेशचे नवे राज्यपाल!

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्र, बिहारसह 13 राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त केले. महाराष्ट्रातील वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस राज्यपाल म्हणून पदभार स्विकारणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. याच वर्षी सुप्रीम कोर्टातून निवृत्त होणारे न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जस्टीस नझीर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असताना राम मंदिर, तीन तलाक आदी महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. राम मंदिराचा तिढा सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या घटनापीठात नजीर हे सुद्धा होते. ते गत महिन्यातच सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या वादाचा निर्णय दिला होता. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या खंडपीठाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांची यापूर्वीच राज्यसभेच्या सदस्यत्वपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता या खंडपीठातील अन्य एक न्यायाधीश असणारे एस.अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Sambhajiraje Chatrapati : कोश्यारींना हटवणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण!

निवृत्तीनंतर लगेच मोठ्या पदावर नियुक्त होणारे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील नजीर हे तिसरे न्यायाधीश आहेत. यापूर्वी रंजन गोगोई यांना राज्यसभेवर घेण्यात आलं आहे. तर जस्टीस अशोक भूषण यांना निवृत्तीनंतर चार महिन्यानंतर 2021च्या राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

कोण आहे न्यायमूर्ती नझीर?
न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1958 रोजी झाला. नझीर यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या अंगावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्या. त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेतले. वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कर्नाटकच्या स्थानिक न्यायालयात वकिली केली.
त्यानंतर बंगळुरु हाय कोर्टात त्यांची त्यांची नियुक्ती झाली. 2003 साली त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. नझीर यांनी जवळपास 20 वर्षं कर्नाटक उच्च न्यायालयात सेवा बजावली.

 

 

 

 

Tags

follow us