Sambhajiraje Chatrapati : कोश्यारींना हटवणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण!

Sambhajiraje Chatrapati : कोश्यारींना हटवणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण!

नाशिक : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivajimaharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitrobai Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी सातत्याने अपमान केला. त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन केली. तरीही त्यांना दीड महिने पदावर ठेवले. खरंतर राज्यपाल कोश्यारीना आधीच पदावरून हटवायला हवे होते. दीड महिन्यानंतर हटवणे म्हणजे हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह देशातील वेगवेगळ्या १३ राज्यांच्या राज्यपालांच्या बदलीचे आदेश रविवारी (दि. १२) रोजी काढले. त्यात महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्यावर संभाजीराजे छत्रपती बोलत होते. संभाजीराजे म्हणाले की, राज्यपालांच्या विरोधात राज्यातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. तरीही सरकारने त्याची दखल घेतली नाही. खरंतर सरकारने कोश्यारीना दोन महिन्या पूर्वीच हटवायला पाहिजे होते. गेले दीड-दोन महिने सरकार कशाची वाट पाहत होते. आता राज्यपालांना हटवणे म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टोला लगावला.

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाने राज्यपाल कोश्यारी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यात किती गदारोळ झाला. प्रत्येक जण या राज्यपाल कोश्यारीना महाराष्ट्रातून हकला, घालवा म्हणत होता. त्याची तेव्हाच दखल घ्यायला हवी होती. सरकार कोणत्या गोष्टींची वाट पाहत होते. आज आता इतक्या उशिराने कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर जरी झाला असला तरी आम्ही स्वागत करू. पण तरीही सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असेच आम्ही मानतो, असे संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube