ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे त्यांना मणिपूर राज्य सांभाळता येत नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ निपाणीत शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.
Video: झिरवळांचा मुख्यमंत्रिपदावर दावा; अजितदादांचे टेन्शन वाढले
शरद पवार म्हणाले, आपला देश चार भागांत पसरलाय. त्यामध्ये दक्षिणेस महाराष्ट्र, उत्तरेस दिल्ली, पंजाब, हिमालयीन भागांत मणिपूरसारखं राज्य आहे. मणिपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांना मणिपूर सांभाळता येत नसल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच एकीकडे मणिपूरसारख्या राज्यांत हिंसाचार सुरु आहे. तर देशात अनेक समस्या असताना दुसरीकडे कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये भाजप नेते व्यस्त आहेत. हे सगळं सुरु असतानाच भाजपचे लोकं काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. सत्ताधाऱ्यांनी मणिपूर कसं वाचवता येईल, विद्यार्थी कसे वाचवता येतील, त्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
अजितदादांनी केली शिंदेंची नक्कल; म्हणाले, स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?
देशात काही राज्यांत भाजपचे नेते आमदारांना फोडून सत्तेत आले आहेत. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये पैसा आणि सत्तेचा वापर करुन लोकांना फोडून भाजप सत्तेवर आलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, देशात लोकशाही टिकवायची असेल तर आता अशा लोकांना सत्तेपासून दूर करण्याची वेळी आलीय, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा, असं आवाहन शरद पवारांनी मतदारांना केलं आहे. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनसमुदाय उपस्थित होता.