Sonam Wangchuk : इरोम शर्मिलांपासून ते अण्णा हजारेपर्यंत, भारतात कोण-कोणती उपोषणे गाजली

Sonam Wangchuk यांच्या आंदोलनामुळे देशातील ऐतिहासिक आमरण उपोषणांची पुन्हा एकदा चर्चा.. आतापर्यंत कोण-कोणती उपोषणे गाजली...

india longest hunger strike history

india longest hunger strike history

Sonam Wangchuk Hunger Strike : दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 21 दिवसांहून अधिक काळ ते उपोषण करत असून, NEET परीक्षेतील कथित अनियमिततेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. वांगचूक यांच्या आंदोलनामुळे देशातील ऐतिहासिक आमरण उपोषणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत इरोम शर्मिलांपासून ते अण्णा हजारेपर्यंत भारतात कोण-कोणती उपोषणे गाजली त्याबद्दल जाणून घेऊया…

भारतातील गाजलेली ऐतिहासिक उपोषणे कोणती?

इरोम शर्मिला, तब्बल 16 वर्षांचा संघर्ष : मणिपूरमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याच्या (AFSPA) विरोधात इरोम शर्मिला यांनी नोव्हेंबर 2000 ते ऑगस्ट 2016 असा तब्बल 16 वर्षे उपोषण केले. सक्तीने नाकावाटे अन्न देण्यात येत असतानाही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. हे जगातील सर्वात प्रदीर्घ उपोषणांपैकी एक मानले जाते.

भगतसिंह : तुरुंगातील 116 दिवसांचे उपोषण : 1929 मध्ये लाहोर तुरुंगात भारतीय राजकीय कैद्यांना ब्रिटिश कैद्यांप्रमाणेच सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी भगतसिंह यांनी 116 दिवस उपोषण केले. अखेर काँग्रेस नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

स्वामी निगमानंद : हरिद्वार परिसरातील गंगा नदीतील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी स्वामी निगमानंद यांनी 115 दिवस उपोषण केले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे निधन झाले.

गंगेच्या संवर्धनासाठी जी. डी. अग्रवाल यांचा 111 दिवसांचा लढा : पर्यावरणवादी आणि आयआयटीचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल (स्वामी ज्ञानस्वरूप सानंद) यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी 111 दिवस उपोषण केले. उपोषणादरम्यानच त्यांचे निधन झाले.

जतीन दास : 63 दिवसांचे बलिदान :  ब्रिटिश तुरुंगात भारतीय कैद्यांना राजकीय कैद्यांचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी जतीन दास यांनी 63 दिवस उपोषण केले. अखेरीस उपोषणादरम्यानच त्यांचे निधन झाले.

पोट्टी श्रीरामुलू यांच्या उपोषणानंतर स्वतंत्र आंध्र राज्य : तेलगू भाषिकांसाठी स्वतंत्र आंध्र राज्याच्या मागणीसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी 56 दिवस आमरण उपोषण केले. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने स्वतंत्र आंध्र राज्याची घोषणा केली.

महात्मा गांधी : उपोषणातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश :  महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक सुधारणांसाठी आयुष्यात 18 वेळा उपोषण केले. त्यांचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले 21 दिवसांचे उपोषण 1933 मध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि आत्मशुद्धीसाठी होते.

अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाने देश हादरला : 2011 मध्ये भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी 13 दिवस उपोषण केले. या आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि सरकारला कायद्याबाबत पुढाकार घ्यावा लागला.

आता सोनम वांगचूक यांचे आंदोलन चर्चेत

गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचूक हे NEET परीक्षेतील कथित अनियमिततेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणावर होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत असल्याने कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version