Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तेलंगाणातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क यांनी याआधीच सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवावी असे सांगितले आहे. सोनिया गांधी पाच वेळा लोकसभेच्या खासदार आहेत. 2019 मधील निवडणुकी त्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
तेलंगाणा राज्य काँग्रेसने (Telangana Congress) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि त्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना (Mallikarjun Kharge) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकार देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांवर 3 फेब्रुवारीपर्यंत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले. अर्जांची तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील सर्व 17 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी मंत्री आणि प्रभारींवर सोपवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. काँग्रेस 2 फेब्रुवारीपासून जाहीर सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे.
Ravanth Reddy : मुख्यमंत्री होताच रेवंथ रेड्डींनी दिला राजीनामा?
डिसेंबर महिन्यात तेलंगाणातील काँग्रेस समितीने राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे आवाहन सोनिया गांधी यांना केले होते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात विजय मिळवला. सोनिया गांधी जर लोकसभा निवडणुकीत राज्यातून विजयी झाल्या तर ही कामगिरी कायम राखता येईल, असे सांगण्यात येत आहे.
राज्य काँग्रेस समितीने तयार केलेला हा प्रस्ताव सोनिया गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर सोनिया गांधी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोनिया गांधींनी याआधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढली आहे. सोनिया गांधी यांच्या आधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1980 मध्ये मेडक (आधीचा आंध्र प्रदेश आता तेलंगाणा) मतदारसंघातून निवडणूक लढली होती.
Sonia Gandhi : लोकशाहीचा प्रत्येक स्तंभ उद्ध्वस्त होतोय, जनता गप्प बसणार नाही; लेखातून सरकारवर टीका
तेलंगाणा की हिमाचल प्रदेश?
दरम्यान, सोनिया गांधी हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर जाऊ शकतात अशीही चर्चा आहे. तसेच तेलंगाणातूनही राज्यसभेवर जाऊ शकतात. तर प्रियंका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आहे. सोनिया गांधी सध्या रायबरेलीतून लोकसभेच्या खासदार आहेत. आता त्या पुन्हा लोकसभा निवडणूक लढणार का, कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करणार की राज्यसभेवर जाणार याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही.