राजकोट : “उर्वरित जग नवीन तंत्रज्ञानाचा पाठलाग करत असताना, गुजराती लोक अगदी साध्या गोष्टींमध्येही नावीन्य आणण्याचा मार्ग शोधतात”, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी गुजराती लोकांचे कौतुक केले. ते गुजरातमधील राजकोट येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करताना बोलत होते. (Supreme Court Chief Justice Dhananjay Chandrachud praised Gujarati people.)
चंद्रचूड म्हणाले, “आज आपण या भव्य नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसह एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, राजकोट जिल्हा हा राज्यातील चौथा सर्वात मोठा जिल्हा आहे. मला आताच्या क्षणाला एक मजेदार म्हण आठवते. जे गुजरातचा आत्मा प्रतिबिंबित करते.
उर्वरित जग नवीन तंत्रज्ञानाचा पाठलाग करत असताना, गुजराती लोक अगदी साध्या गोष्टींमध्येही नावीन्य आणण्याचा मार्ग शोधतात. उदाहरणार्थ, चहाला व्यवसायिक धोरणाच्या बैठकीत बसवणे हा एक उत्कृष्ट गुजराती ह्युमर आहे”
याशिवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायव्यवस्थेतील तंत्रज्ञानाचे रुपांतर हे केवळ आधुनिकीकरणाशी संबंधित नाही, तर न्याय मिळवून देण्याच्या लोकशाहीच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वकिलांना प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या प्रगतीचा लाभ घेतल्याने अंतर भरून काढण्यात आणि कार्यक्षमता वाढविण्यात मदत होईल. भौगोलिक आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे न्यायदानात अडथळा येणार नाही याचीही हमी सामान्यांना मिळू शकेल.
यावेळी चंद्रचूड यांनी एआय-आधारित ‘टेक्स्ट-टू-स्पीच कॉल-आउट सिस्टिम’चे उद्घाटन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयातील अद्ययावत ऑडिओ-व्हिडिओ उपकरणे आणि प्रणालींनी सुसज्ज असलेल्या कॉन्फरन्स रूम आणि प्रशिक्षण कक्षाबद्दलही माहिती दिली.
जिल्हा न्यायालयांचे महत्त्व अधोरेखित करताना, चंद्रचूड म्हणाले, “या न्यायालयांना न्याय हक्क सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रत्येक नागरिकाला खात्रीने न्याय मिळण्याचा अधिकार असलेल्या समाजाची कल्पना करण्यासाठी आपल्या संविधानाच्या आदर्शांचा आधारस्तंभ आहे.”