LNT SN Subramanian Controversial Statement : एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आणि सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू झाला. (Statement) या वक्तव्यावरुन चित्रपट जगतापासून ते व्यावसायिक जगतापर्यंत बड्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली. आठवड्यात 90 तास काम करण्याबद्दल ते बोलले आणि त्यानंतर झालेल्या टीकेनंतर त्यांनी आता स्पष्टीकरणही दिलं आहे. दरम्यान, चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांचा पगार वार्षिक ५१ कोटी रुपये आहे, जो त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास ५३५ पट जास्त आहे.
वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला;भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं का म्हणाले?
जेव्हापासून त्यांची क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर व्हायरल झाली आहे. तेव्हापासून सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. या सगळ्यात त्यांना मिळणाऱ्या पगाराचीही चर्चा होऊ लागली. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, 2023-24 साठी त्यांचा वार्षिक पगार 51 कोटी रुपये होता, ज्यामध्ये मूळ वेतन 3.6 कोटी रुपये, 1.67 कोटी रुपये पूर्व-आवश्यक मूल्य, 35.28 कोटी रुपयांचे कमिशन आणि 10.5 कोटी रुपयांचा सेवानिवृत्तीचा नफा समाविष्ट आहे.
काय म्हणाले होते?
सुब्रह्मण्यम हे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान बोलताना आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. तसंच, पुढे ते म्हणाले, ‘रविवारी मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही याबद्दल मला वाईट वाटतं, जर मी हे करू शकलो तर मी हे करेन. कारण मी स्वतः रविवारी काम करतो. एवढंच नाही, तर रेडीटवर प्रसारित झालेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, एल अँड टी एस एन सुब्रह्मण्यम हे फक्त 90 तास काम करण्याचा सल्ला देऊन थांबले नाही, ते पुढे म्हणाले, ‘घरी राहून तुम्ही किती वेळ तुमच्या पत्नीकडे बघत राहाल? घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा.’ असं एस एन सुब्रह्मण्यम हे म्हणाले आहेत.
एस एन सुब्रह्मण्यम यांच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू झाला. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका या वक्तव्याचा निषेध केला. असे निर्णय घेताना सनडेचं नाव बदलून सनड्युटी केलं पाहिजे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टा स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या विधानाचा निषेध केलेलं दिसलं. ‘एवढ्या उच्च पदावर बसलेली एक वरिष्ठ व्यक्ती असं विधान कसं करून शकते, हे वाचून धक्का बसला, कारण मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे.’
चीनचं उदाहरण दिलं
सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यात 90 तास काम करण्याचा सल्ला देताना, एका चिनी व्यक्तीशी झालेल्या संभाषणाचं उदाहरण दिलं होतं. ते म्हणाला की, त्या माणसाने असा दावा केला होता की, चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चिनी कामगार आठवड्यातून 90 तास काम करतात. तर अमेरिकेत 50 तासांचा कामाचा आठवडा असतो. हे उदाहरण देत, ‘सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना सल्ला दिला की, जर तुम्हाला जगात प्रथम स्थानावर यायचं असेल तर आठवड्यातून 90 तास काम करावं लागेल’.