Mohali Building Collapsed : पंजाबमधील मोहालीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, मोहाली येथे तीन मजली इमारत (Mohali Building Collapsed) अचानक कोसळली. या अपघातात 20 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
माहितीनुसार, या इमारतीच्या आत एक जिम (gym) चालू होती. इमारतीजवळ तळघराचे खोदकामही सुरू होते, त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ती कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी जिममध्ये लोक जिम करत होते, त्यामुळे जिममध्ये उपस्थित असलेले लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.
अपघाताच्या वेळी जिममध्ये किती लोक होते, याची माहिती प्रशासन जिम व्यवस्थापकांकडून घेत आहे. सोहाना सैनी (Sohana Saini) बागेजवळ इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पीजी असून तिसऱ्या मजल्यावर जिम चालवली जात होती. निवासी इमारतीत जिम आणि पीजी बेकायदेशीरपणे सुरू होते. इमारतीसह तळघराचे खोदकाम सुरू होते. त्यामुळे या इमारतीचा पाया कमकुवत झाला आणि आज अचानक कोसळला.
ढिगाऱ्याखाली सुमारे 20 लोक अडकल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफचे पथक प्रयत्न करत आहेत.
मोहालीचे एसएसपी दीपक पारीक यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली किती लोक आहेत, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. अपघाताचा तपास सुरू आहे.