तामिळनाडूत मोठी राजकीय घडामोड, थलपती विजय यांच्या टीव्हीकेचा ‘इंडिया’ आघाडीत प्रवेश

टीव्हीकेच्या आगमनामुळे आघाडी अधिक मजबूत होईल आणि तामिळनाडूमध्ये भाजप आणि आरएसएसविरोधातील राजकीय लढ्याला नवे बळ मिळेल.

Untitled Design   2026 10 04T095350.461

Untitled Design 2026 10 04T095350.461

TVK joins the INDIA bloc : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून, टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाने शनिवारी अधिकृतपणे ‘इंडिया’ आघाडीत प्रवेश केला. टीव्हीकेचे नेते विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पहिल्यांदाच ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील विरोधकांच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, टीव्हीके आता ‘इंडिया’ आघाडीच्या निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनातही सहभागी होणार आहे. विजय यांच्या पक्षाचा हा निर्णय आगामी काळातील तामिळनाडूच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकम टागोर यांनी टीव्हीकेच्या ‘इंडिया’ आघाडीतील सहभागाचे स्वागत केले आहे. ‘इंडिया’ आघाडीसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे टागोर यांनी म्हटले आहे. टीव्हीकेच्या आगमनामुळे आघाडी अधिक मजबूत होईल आणि तामिळनाडूमध्ये भाजप आणि आरएसएसविरोधातील राजकीय लढ्याला नवे बळ मिळेल, असा दावा त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कारभाराविरोधातील विरोधकांचा संघर्ष आता तामिळनाडूमध्ये अधिक रंजक होणार असल्याचेही टागोर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची गर्जना, गर्जना मोर्च्याच्या माध्यमातून आज राज-उद्धव ठाकरे रस्त्यावर

आतापर्यंत तामिळनाडूमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून डीएमकेची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, डीएमके आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने आघाडीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, टीव्हीकेकडे सध्या एकही खासदार नसतानाही पक्षाला आघाडीत स्थान मिळाल्याने या निर्णयाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विजय यांच्या लोकप्रियतेचा आणि टीव्हीकेच्या वाढत्या राजकीय प्रभावाचा फायदा आघाडीला होईल, अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय आघाडीची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णयही ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे. जिल्हा पातळीवर निदर्शने आयोजित करून निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आवाज उठवला जाणार असल्याचे माणिकम टागोर यांनी सांगितले. या आंदोलनात टीव्हीके देखील सहभागी होणार असल्याने विरोधकांच्या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीव्हीकेचा ‘इंडिया’ आघाडीत प्रवेश आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन या दोन्ही घडामोडी तामिळनाडूच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Exit mobile version