TVK youth leader S. Keertana : तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘तमिळगा वेत्री कळघम’ म्हणजेच तामिळगा वेत्री काझगम या पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय झेप घेतली असताना, या निवडणुकीतून एक नवं आणि युवा नेतृत्वही पुढे आलं आहे. अवघ्या 29 व्या वर्षी शिवकाशी मतदारसंघातून विजयी झालेल्या एस. कीर्तना या आता तामिळनाडूच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्या टीव्हीकेच्या सर्वात तरुण आमदारांपैकी एक असून, नव्या पिढीच्या राजकारणाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
एस कीर्तना यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून दमदार विजय मिळवत काँग्रेसचे उमेदवार अशोकन जी यांचा तब्बल 11 हजार 670 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 68 हजार 709 मते मिळाली. विशेष म्हणजे, गेल्या सुमारे सात दशकांत शिवकाशीतून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. एवढंच नाही, तर त्यांनी माजी एआयएडीएमके मंत्र्यांनाही पराभूत करत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलीने थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास केल्याने त्यांच्या संघर्षाची आणि मेहनतीची मोठी चर्चा सुरू आहे. 1996 मध्ये विरुधुनगर येथे जन्मलेल्या कीर्तनांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तमिळ माध्यमाच्या सरकारी शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून गणित विषयात बीएससी पदवी घेतली. पुढे 2019 मध्ये पुद्दुचेरी युनिव्हर्सिटी मधून सांख्यिकी विषयात एमएससी शिक्षण पूर्ण केलं.
राजकारणात येण्यापूर्वी कीर्तना यांनी राजकीय सल्लागार आणि डिजिटल निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलं. त्यांनी शोटाईम कन्सल्टिंग आणि इंडियन पोलिटिकल ऍक्शन कमिटी अर्थात आयपॅकमध्ये विविध निवडणूक मोहिमांवर काम केलं. या काळात त्यांनी देशातील अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम करत राजकारण, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थेचा जवळून अभ्यास केला.
पूजा-विधी, फोटो, व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहार; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची कसून चौकशी
कीर्तनांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत विविध निवडणूक मोहिमांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी तेलगू देसम पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि डीएमके यांच्या प्रचार मोहिमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. राजकीय रणनीतीकार म्हणून मिळालेल्या अनुभवामुळे प्रशासन कसं चालतं, नोकरशाहीची रचना कशी असते आणि निर्णय प्रक्रिया कशा प्रकारे काम करते, याचं सखोल ज्ञान मिळाल्याचं कीर्तना सांगतात. मला नेहमीच राजकारणात यायचं होतं. त्यामुळे मी राजकीय रणनीतीकार म्हणून करिअर निवडलं. विविध नेत्यांसोबत काम करताना प्रशासन आणि सिस्टीमची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली, असं त्यांनी सांगितलं.
कीर्तनांची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं बहुभाषिक व्यक्तिमत्त्व. त्या तमिळ, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगूसह पाच भाषा सहजपणे बोलू शकतात. विविध राज्यांमध्ये काम करताना भाषेचं ज्ञान मोठं शस्त्र ठरल्याचं त्या सांगतात. भाषेमुळे मला वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्या. हिंदी बोलल्यामुळे विजय यांचा संदेश देशभरातील अधिक लोकांपर्यंत पोहोचवता आला, असंही त्यांनी नमूद केलं.
राजकारणात पैसा किंवा घराणेशाही नसतानाही टीव्हीकेने स्वतःसारख्या तरुणांना संधी दिल्याचं त्या स्पष्टपणे सांगतात. टीव्हीके हा असा पक्ष आहे, जिथे प्रत्येकासाठी दारं उघडी आहेत. माझ्याकडे राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नव्हती, तरी मला संधी मिळाली. लोकांसाठी काम करण्याची इच्छा असेल, तर इथे तुमचं स्वागत आहे, असं म्हणत त्यांनी पक्षावरील विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेमध्ये युवा चेहऱ्यांना मिळत असलेलं महत्त्व आता स्पष्टपणे दिसून येत आहे. एस. कीर्तना यांचा उदय हा केवळ एका तरुण आमदाराचा विजय नसून, तामिळनाडूच्या बदलत्या राजकारणाचं आणि नव्या पिढीच्या वाढत्या सहभागाचं प्रतीक मानलं जात आहे.
