पूजा-विधी, फोटो, व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहार; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची कसून चौकशी

पोलिसांना जी माहिती आवश्यक होती, त्यामध्ये आपण पूर्ण सहकार्य केले असून त्यासंदर्भातील माहिती मी तुम्हाला देईल असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं.

  • Written By: Published:
Untitled Design 12

Rupali Chakankar’s thorough interrogation : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज एसआयटीकडून तब्बल सात तास कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे या चौकशीत नेमके कोणते प्रश्न विचारले गेले, कोणत्या मुद्द्यांवर तपास यंत्रणांनी अधिक भर दिला, याची राज्यभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी मला कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर आज त्यांना एसआयटीसमोर हजर राहावे लागले.

अशोक खरात प्रकरणातील तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, विविध गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी देखील वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, धार्मिक विधींच्या नावाखाली हालचाली, तसेच राजकीय संबंध यांचा तपास एसआयटीकडून बारकाईने केला जात आहे. यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची देखील चौकशी करण्यात आली होती. पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे ही चौकशी झाल्याची माहिती समोर आली होती. आता स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी झाल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांना जी माहिती आवश्यक होती, त्यामध्ये आपण पूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. एसआयटीसमोर आपण सविस्तरपणे बाजू मांडली असून तपास यंत्रणांना समर्पक उत्तरे दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या चौकशीसंदर्भातील सविस्तर माहिती पुढे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. चौकशी संपल्यानंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; मोठे मासे वाचवण्यासाठी आर्थिक रॅकेट सक्रिय – रोहित पवार

दरम्यान, एसआयटीने चौकशीत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातसोबत संबंध नेमके केव्हापासून होते, शिवनिका संस्थांमध्ये काम करत असताना खरातच्या कथित गैरप्रकारांची माहिती होती का, अशोक खरातसोबत करण्यात आलेल्या पूजा-विधींचे स्वरूप काय होते, तसेच त्या माध्यमातून काही आर्थिक संबंध प्रस्थापित झाले होते का, यासंदर्भात विचारणा करण्यात आली. याशिवाय, अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील आहेत, ते कधीचे आहेत, तसेच शिवनिका संस्थांच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जात होते, याबाबतही एसआयटीने प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती आहे.

या चौकशीदरम्यान एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः रुपाली चाकणकर यांची दोन तासांहून अधिक वेळ थेट चौकशी केल्याचे समोर आले आहे. अशोक खरातच्या मंदिरात विविध राजकीय व्यक्तींची ये-जा कोणाच्या सांगण्यावरून होत होती, तसेच खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले, यासंदर्भातही तपास यंत्रणांनी सखोल माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील तपासाचा वेग वाढला असून, या प्रकरणात आणखी काही राजकीय आणि आर्थिक धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us