युपीएससी ही भारतासह जगातील सर्वात अवघड परीक्षा (Exam) मानली जाते. या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी अधिकारी म्हणून काम करतात. उम्मुल खेर यांनी कठीण परिस्थितीवर मात करत या परीक्षेत यश मिळवलं आहे. मात्र त्यांची कहाणी थोडी वेगळी आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.
उम्मुल खेर पाच वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब दिल्लीमध्ये आले होते. त्यांचे वडील हजरत निजामुद्दीन परिसरात कपडे विकायचे आणि ते जवळच्या झोपडपट्टीत राहत होते. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहे. उम्मुल खेर यांना लहानपणापासूनच आयुष्य कठीण असल्याची जाणीव होती, कारण त्यांचे स्वतःचे शरीरच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान ठरणार होते. उम्मुल यांना एक दुर्मिळ हाडांचा आजार झाला होता, ज्याला ‘ब्रिटल बोन डिजीज’ असं म्हणतात.
तपासासाठी पोलिसांचं पथक परराज्यात; नीट पेपर लीक प्रकरणातला म्होरक्या मराठवाड्यातलाच
या आजारामध्ये हाडे अत्यंत कमजोर होतात आणि किरकोळ दुखापत झाली तरी सहज फ्रॅक्चर होऊ शकते. उम्मुल थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांना तब्बल 16 फ्रॅक्चर झाले त्यामुळे 8 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मात्र तरीही त्यांचा धीर खचला नाही. उम्मुल खेर पाचवीपर्यंतचं शिक्षण पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकली हँडिकॅप्ड येथे घेतलं आणि त्यानंतर अमर ज्योती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये प्रवेश घेतला.
आठवी पास झाल्यानंतर उम्मुल यांना एका चांगल्या सुविधा असलेल्या शाळेत शिष्यवृत्ती मिळाली. मात्र त्यांच्या आई-वडिलांची विचारसरणी वेगळी होती. त्यांनी उम्मुल यांना सांगितलं की, तू खूप शिकलीस, आता शिक्षण सोड. पण उम्मुल यांनी शिक्षण सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडावे लागले, त्यावेळी उम्मुल फक्त 14 वर्षांच्या होत्या.
उम्मुल यांनी उदरनिर्वाहासाठी झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला सुरुवात केली. प्रत्येक मुलाकडून त्यांना 50 ते 100 रुपये मिळायचे. या पैशांत कसाबसा खर्च भागत होता, पण त्यांची जिद्द कायम होती. त्यांनी दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आणि बारावीत तब्बल 91 टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित गार्गी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केलं. पदवी पूर्ण केल्यानंतर उम्मुल यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
शिक्षण घेत असतानाच त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले होते. झोपडपट्टीतील आयुष्य, हाडांचे फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रियांचा सामना करूनही त्यांनी कधी हार मानली नाही. 2017 मध्ये, वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा दिली. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 420 वा क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची निवड आयआरएस अधिकारी म्हणून झाली. त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
