इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली (Indigo) विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिगो विमानाचे बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
इंडिगोच्या सेवेत झालेलेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. DGCA च्या FDTL आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली असून, प्रवासी हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयात 24×7 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिगो विमान कंपनीचे सर्व उड्डाणं रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील आणि तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील असे मोहोळ म्हणाले. तसंच, नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विमान उड्डाणांचे वेळापत्रक स्थिर होईल आणि आज मध्यरात्री सामान्य स्थिती येईल. पुढील काही दिवसांत संपूर्ण सेवा आणि स्थिरता येईल. इंडिगो आणि इतरांनी स्थापित केलेल्या माहिती प्रणालीद्वारे प्रवासी घरी बसून विलंबाचा माहिती घेऊ शकतात.
उड्डाण रद्द झाल्यास इंडिगो तिकिटांसाठी स्वयंचलितपणे पूर्ण परतफेड सुनिश्चित करेल. प्रवासी अडकले असल्यास त्यांना विमान कंपन्यांनी निवास व्यवस्था बुक केलेल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांना आरामखुर्ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. उशिर झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना अल्पोपहार आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या जातील. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा 24/7 नियंत्रण कक्ष सतत परिस्थितीवर प्रत्यक्ष वेळेवर लक्ष ठेवून आहे.
