नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliamentary Budget Session) दुसरा टप्पा सुरू असून आज पुन्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी या मागणीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. लंडनमध्ये भारताची प्रतिमा डागाळल्याबद्दल भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत असताना काँग्रेसने अदानी (Adani Group) मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
भाजप नेत्यांनी राहुल गांधींची माफी मागावी अशी घोषणाबाजी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. त्याचवेळी विरोधकांनी अदानी प्रकरणी जेपीसीच्या मागणीसाठी संसदेत आणि बाहेर विरोध केला.
संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर आणि नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते.
अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, सरकारलाच संसद चालवायचे नाही. सरकारच्या मंत्र्यांनी सभागृह ठप्प करण्यासाठी गदारोळ केला, असे दृश्य कधी पाहिले नाही. चौधरी म्हणाले की, राहुल गांधी माफी का मागणार? त्यांनी काही गुन्हा केला आहे का? सरकारने जनतेची माफी मागावी.
सभागृहात झालेल्या गदारोळावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने रडणे थांबवावे आणि देशाची माफी मागावी, असे ते म्हणाले. ठाकूर म्हणाले की, आज भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि भारत G20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. या सगळ्या गोष्टी भारताची प्रगती दाखवतात पण दुसरीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन भारताचा अवमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
ठाकूर म्हणाले की, एकीकडे सभागृह चालू आहे आणि राहुल जगभर सांगतात की त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही, तर सभागृहात त्यांची उपस्थिती फारच कमी आहे.