Vinesh Phogat Joins Congress : हरियाणा विधानसभेच्या (Haryana Elections) निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्ष (Congress Party) कमालीचा अॅक्टिव्ह झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. राज्यातील वाढत्या अँटी इन्कम्बसीचा फटका भाजपला बसू शकतो असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं निश्चित करताना वरिष्ठांची दमछाक होत आहे. यातच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघेही लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आज दुपारी दोन्ही पहिलवानांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विनेश, बजरंग राजकीय आखाड्यात उतरणार? राहुल गांधींसोबत बैठक; मतदारसंघांवर चर्चा
काँग्रेसने आमच्या अश्रूंचं मोल ओळखलं. संकटाच्या काळातच आपल्या माणसांची ओळख होते. आता ही संधी देशातल्या लोकांसाठी आहे. नवीन इनिंग सुरू करतेय याचा मला अभिमान आहे, असे विनेश फोगाटने यावेळी सांगितले. बजरंग पुनिया म्हणाला, काँग्रेसच देशाला आणखी बळकट करू शकते. भाजप कधीच आमच्याबरोबर उभा राहिला नाही. आता आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला तर आमच्यावर टीका केली जात आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) काँग्रेसमध्ये सामील होईल अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता फोगाटने राहुल गांधींची भेट घेतल्याचे समोर आल्याने या चर्चांना बळ मिळालं होतं. राजकीय वर्तुळातील चर्चा ऐकल्या तर विनेशला दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं. तर बजरंग पुनिया बादली मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण काँग्रेस त्यांना एखाद्य जाट बहुल मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची तयारी करत आहे.
विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. असं असलं तरी विनेश फोगाटने अजून तरी राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली नव्हती. थेट काँग्रेस मुख्यालयात येऊन पक्षात प्रवेश घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेशने राजकारणात पदार्पण केलं आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
हरियाणात भूकंप! पहिल्या यादीनंतर राजीनाम्यांचं सत्र; ‘या’ दिग्गजांची भाजपाला सोडचिठ्ठी
ज्यावेळी विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही विनेशला राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. वयामुळे ही गोष्ट शक्य नव्हती. विनेशचे काका महावीर फोगाट आणि चुलत बहिण बबिता फोगाट यांनी मात्र काँग्रेसच्या या धोरणावर टीका केली होती.